दिशा महिला मंच व्यासपीठाचा पुढाकाराने कामोठे पोलीस ठाण्यात दिपोत्सवाचे आयोजन
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पोलीस ठाणे म्हटले की, तक्रारीसाठी बाहेर उभे असलेले नागरिक, स्टेशन हाऊस मध्ये सुरु असलेला तक्रारींचा पाऊस, गुन्ह्यांची सीसीटीएनएस मध्ये एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या नोंदी, पोलीस अधिकार्यांची धावपळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनबाहेर भेटण्यासाठी आलेले नागरिक, गुन्हे प्रकटीकरणाची चालू असलेली कसरत, नियंत्रण कक्षातील येणारे संदेश, टपाल, गस्त, पोलीस कोठडी, जनरल ड्युटया, ठाणे अमलदार यांची व्यस्तता वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या सूचना हा सर्व कामाचा व्याप पोलीस ठाण्यात सुरु असतो. याला कामोठे पोलिस ठाणे सुद्धा अपवाद नाहीत. कारण हा दैनंदिन चा भाग आहे. या पोलीस ठाण्याच्या आवारात प्रकाश, उत्साह, आनंद आणि गोडवा अनुभवायला मिळाला. निमित्त होते दिशा महिला मंच व्यासपीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव होय. पोलीस ठाण्याच्या आवारात त्याचबरोबर आत मध्ये दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. रांगोळी काढून एक प्रकारे मंगलमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. हे कामोठे करांच्या दृष्टीने एक प्रकारे नवलाईच होती.
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरण करीत गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस करतात. 24 तास 12 महिने पोलीस ठाणे नागरिकांसाठी खुले असते. खाकी वर्दीमुळे आपण बिनधास्तपणे संचार करू शकतो. त्याचबरोबर सुरक्षितपणे राहू शकतो. कायद्याचे रक्षक म्हणून पोलीस यंत्रणेकडे पाहिले जाते. आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपण्यातही खाकी वरती कधीच मागेपुढे पाहत नाही. कोरोना वैश्विक संकटात डॉक्टर परिचारिकांबरोबरच पोलिसांनी काम केले. टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी खडा पहारा दिला. कोरोना विरोधात रस्त्यावर उतरून एक प्रकारे लढाई केली. नवी मुंबई पोलिस यामध्ये अग्रभागी होते. या काळात सर्वाधिक काम कामोठे पोलिसांनी केले. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले. कामोठे वसाहतीत कोरोना हॉटस्पॉट निर्माण झाला होता. ही परिस्थिती कधी कायद्याचा बडगा उगारत तर कधी जनजागृती आणि समजूत काढत कौशल्यपूर्ण पणाने हाताळणी . कामोठे पोलिसांनी जमावबंदीचे काटेकोर पालन केले. कर्तव्य बजावत असताना अधिकारी आणि कर्मचार्यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली. मात्र या आजारावर मात करत पुन्हा हे कोविड योद्धे कर्तव्यावर हजर झाले. सण- उत्सव पोलिसांना आपल्या कुटुंबाबरोबर कधीच साजरा करता येत नाही. ते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी खडा पहारा देत असतात. विशेषता दिवाळीचा सणाला पोलीस ठाण्यात किंवा कर्तव्यावर राहावे लागते. या पार्श्वभूमीवर जनतेची सुरक्षा हीच दिवाळी मानून तसेच हा सण शांततेत पार पडण्यासाठी पोलीस चोख कर्तव्य बजावत असतात. कुटुंबाबरोबर ही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक पोलिसांना सुट्टी मिळणे शक्य नाही. म्हणून दिशा महिला मंच व्यासपीठाने कामोठे पोलीस ठाण्यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी व एक दिवा नव्या उमेदीसाठी या उद्देशाने दीपोत्सव साजरा केला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम करण्यासाठी पोलीस बांधवांचा उत्साह त्याचबरोबर त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोमोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या उत्सवाला सुरुवात झाली. पोलीस बांधव आणि भगिनींना शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरशा उजळून निघाला. दिवाळीच्या या आनंदात कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील , दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे आणि विद्या मोहिते यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या माध्यमातून काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले . यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक नाजूका पाटील, कामोठे पोलिस कर्मचारी तसेच रेखा ठाकूर , सारिका माळी , खुशी सावर्डेकर, उषा डुकरे , स्वप्नाली दोषी ,कीर्ती हंम्पे या दिशा व्यासपीठातील महिला उपस्थिती होत्या.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे.कोणताही सण,उत्सव असला तरी पोलीस कुटुंबापासून दूर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात . या पार्श्वभूमीवर तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून कामोठे पोलीस ठाण्यात दिशा महिला मंच व्यासपीठाने दीपोत्सव साजरा केला. या अनोख्या उपक्रमामुळे पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच येथे आलेल्या नागरिकांच्या चेहर्यावर उत्साह आणि आनंद दिसून आला. हीच आमच्या दृष्टिकोनातून खरी दिवाळी ठरली.
निलम आंधळे
संस्थापिका
दिशा महिला