नैना प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक भुमीपूत्रांच्या साथीला शिवसेना आहे- खा. श्रीरंग बारणे
पनवेल, दि.22 (वार्ताहर)- पनवेल परिसरातील 23 गावांतील ग्रामस्थांचा नैना प्रकल्पाला विरोध आहे. या भूमीपूत्रांच्या साथीला शिवसेना असून त्यांची मागणी रास्त असल्याने याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांनी विहीघर येथील आयोजित भूमीपूत्रांच्या बैठकीच्या वेळी दिले. यावेळी खा. श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे,ॲड.सुरेश ठाकुर, नामदेव फडके, उपतालुकाप्रमुख बबन फडके, नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, अनिल ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती सातत्याने या प्रश्नावरून लढा देत आहे. 23 गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे. 2013 साली या प्रकल्पाला सुरवात झाली. परंतु अद्याप फक्त जमिनी अडवून ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक भूमीपूत्रांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. येथील भूमीपूत्र मोठ्या अडचणीत आहेत. यासंदर्भात नामदार एकनाथ शिंदे यांचीसुद्धा भेट घेऊन हा प्रश्न सागण्यात आला आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथीर गरजेपोटी बांधलेली घरे, स्थानिकांना होणारा सिडकोकडून त्रास, विरार-अलिबाग कॉरिडोर मार्ग याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू नये त्यादृष्टीनेसुद्धा शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. लवकरच यासंदर्भातमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांनी दिले. तर यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, शिवसेनेच्या माध्यमातून सिडकोकडे स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यात आली आहे. शिवसेना 80% समाजकारण व 20% राजकारण करते. नैनाच्या प्रश्नावरूनसुद्धा शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभी आहे व त्यांनी न्याय मिळवून देऊ असेही त्यांनी सांगितले.