पुरातन काळातील विहिर (चिरबाव) ला जाळी लावून बंधिस्त करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः खारघर गाव येथे असलेल्या गावदेवी मंदिरासमोरील पुरातन काळातील विहिर (चिरबाव) असून तिला जाळी लावून बंधिस्त करावी अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात गुरुनाथ पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर गाव येथील गावदेवी मंदिरासमोर पुरातन काळातील अशी विहिर (चिरबाव) आहे. सदर विहिरीचा आजूबाजूचा परिसर हा नित्यनियमाचा वर्दळीचा रस्ता असून सदर ठिकाणाहून सदर नागरिकांची ये-जा सुरू असते. या विहिरीतील पाण्याचा वापर येथील रहिवाशी कपडे, धुणे भांडीसाठी आजही करीत आहेत. सदर विहिरीला संरक्षण जाळी नसल्यामुळे कोव्हिड-19 मुळे लागलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सदर विहिरीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाले असून या आधी देखील सदर विहिरीत अपघाती मृत्यू झाले आहेत. तरी या गोष्टीची गांभीर्याने घेवून या विहिरीला जाळी लावून बंधिस्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.