भारत बंदला पनवेल परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला पनवेलमध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महाविकास आघाडीतर्फे पनवेल परिसर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापारी संघटनांनी सहकार्य दिल्याने आजचा बंद यशस्वी झाला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महा विकास आघाडीने पाठिंबा दर्शविला असल्यामुळे आता सुरू असणार्या भारत बंदला यशस्वी प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकर्याचं आंदोलन सरकारकडून अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे शेतकर्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारला दखल घ्यावीच लागेल असा नारा भारतभर शेतकर्यांनी लगावला आहे. शेतकर्यांच्या मागण्या आणि त्यावर केंद्र सरकारची पिछेहाट पाहून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. शेतकर्यांवरील अन्यायाविरोधात कायद्यांमध्ये बदल झालाच पाहिजे आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय होणे गरजेचे आहेत, असा नारा देण्यात येत आहे. यावेळी पनवेल – उरण महाविकास आघाडीच्या दिवंगत दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, कार्याध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, सचिव सुदाम पाटील, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, सहसचिव गणेश कडू, परेश पाटील, लिलाधर भोईर, गुरुनाथ पाटील, शेकाप नेते आर.डी.घरत, काँग्रेसच्या निर्मला म्हात्रे, शेकापच्या डॉ.सुरेखा मोहकर, मा.नगरसेविका प्रमिला कुरघोडे, शशिकला सिंग, शिवदास कांबळे, शहरप्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, अतुल पलण, गुरुद्वारा प्रबंध समितीचे पदाधिकारी आदींसह महा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भारत बंदला यशस्वी केले.
फोटो ः केंद्र सरकार विरोधात निदर्शने करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी.