ड्यु युनिव्हर्सिटी न्यूजर्सीमधून शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाल्याने कुमारी श्रेया आहेर हीचा सन्मान
प्रतिनिधी:पळसपूर येथील कुमारी श्रेया रंगनाथ आहेर हिची नेक्स्ट जिनियस फाउंडेशन मुंबई, यांच्या अंतर्गत अमेरिकेतील ड्यु युनिव्हर्सिटी न्यूजर्सी येथील पुढील शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती म्हणजेच तिला जवळ जवळ १.५ कोटी रुपयांची मंजुरी झाली आहे. तसेच न्यूजर्सी येथील ड्यु युनिव्हर्सिटीमधून भारतातील एकाच विद्यार्थ्याला पूर्ण रकमेची स्कॉलरशिप दिली जात असून सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांमधून श्रेयाची निवड झाली आहे.
अमेरिकेतील न्यूजर्सीमधून ड्यु युनिव्हर्सिटीत श्रेयाला स्कॉलरशिप मिळाली आसल्याने माझं साम्राज्य संचालिका साक्षी सागवेकर यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान शिवसेना संपर्क प्रमुख सुरेखाताई गव्हाणे, शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर, भगवान गव्हाणे, ओमकार गव्हाणे यावेळी उपस्थित होते. तसेच श्रेयाचे वडील प्राचार्य रंगनाथ आहेर व श्रेयाची आई नीलिमा आहेरही उपस्थित होते. श्रेया चा सन्मान हा सुरेखाताई गव्हाणे यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
श्रेयाने दहावीपर्यंतचे शिक्षण पारनेर पब्लिक स्कुलमध्ये पूर्ण केले असून सध्या ती एमआयटी विश्वशांती गुरुकुल पुणे येथे बारावीमध्ये केंब्रिज विद्यापीठाचा इंटरनॅशनल बेकेलोरेट या वर्गात शिकत आहे. तसेच बारावी नंतर ती इंटरनॅशनल रिलेशन हा कोर्स विद्यापीठ आणि युनायटेड नेशन न्युयॉर्क अमेरिका येथून पूर्ण करणार आहे. तिने आतापर्यंत शिक्षणात मिळवलेली सातत्यपूर्ण गुणवत्ता, जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण, मागील वर्षी इंदोर, मध्य प्रदेश येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घेतलेला सहभाग, तसेच बाली इंडोनेशिया, जेकब्स विद्यापीठ ब्रेमेन, जर्मनी तसेच स्नेहालय अहमदनगर येथे इंटरशीप प्रोग्राम मध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग, रक्तदान शिबिरामध्ये केलेली जाणीव जागृती, लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर श्रेयाची निवड केली गेली आहे.