तोतया सिडको अधिकाऱ्याची शिवस्मृती गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी
तोतया सिडको अधिकाऱ्यांविरोधात गृहनिर्माण संस्थेची पोलिसांत तक्रार
सिडको प्रशासनानेही केली चौकशीची मागणी
प्रतिनिधी/पनवेल
तोतया सिडको अधिकारी बनून आलेल्या दोघां अज्ञातांनी नवीन पनवेलमधील एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी करत दंडापोटी काही रक्कम उकळण्याचा या तोतया अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मात्र संस्थेच्या चौकस पदाधिकाऱ्यांमुळे या तोतया अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडलं आणि तोतयांना पळ काढावा लागलाय. याविरोधात सिडको प्रशासन आणि खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
नवीन पनवेल येथील सेक्टर ७ मधील शिवस्मृती सोसायटीने नुकतंच त्यांच्या प्रिमायसेसमधील मैदानाचं नुतनीकरण केलं. मात्र हे नुतनीकरण विना परवानगी केल्याने ते बेकायदेशीर असल्याचं सांगत २६ जानेवारी रोजी सिडकोचे दोन तोतया अधिकारी संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. संस्थेच्या काही सभासदांनी या नुतनीकरणाविरोधात तक्रार केल्याचं सांगत आपण चौकशीसाठी आल्याचं सांगत या दोघांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धमकवायला सुरूवात केली. मात्र प्रजासत्ताक दिनाची सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने सुटीच्या दिवशी अधिकारी कामावर कसे असा संशय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना आला. त्या अनुषंगाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे त्यांचं ओळखपत्र मागत उलटतपासणीला सुरूवात केली असता, या दोघांनी पळ काढला. मात्र त्यापुर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही तोतया अधिकाऱ्यांची छायाचित्र काढली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावून दंडाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा या दोघांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या तोतया अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येतेय.