मांडूळ सापासह खवल्या मांजर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले हस्तगत ; 3 आरोपी अटक
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः मोठ्या रक्कमेच्या हव्यासापोटी मांडूळ सापासह खवल्या मांजर विक्रीसाठी पनवेलबाजूकडे येणार्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 किलो वजनाचा मांडूळ साप व 17 किलो वजनाचे खवल्या मांजर हस्तगत केले आहे.
पोलीस हवालदार अनिल पाटील यांना शेडुंग टोल नाक्याजवळ दोन इसम मांडूळ नावाचा साप वन्यजीव विक्री करिता घेवून येणार असल्याचे माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सापळा रचून आरोपी अजिज शेख (38) व संतोष मंडले (33) यांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रोहिदास गायकवाड (24) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 17 किलो वजनाचे खवल्या मांजर जप्त करण्यात आले आहे. सदर वन्यजीव हे मोठ्या रक्कमेला विकणार होते. त्यासाठी ते ग्राहक शोधत असताना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने ताब्यात घेतले आहे. सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त प्रवीण कुमार व सहा.पो.आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि गिरीधर गोरे, सहा.पो.नि.गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, पो.उपनिरीक्षक वैभव रोंगे, स.फौ.सुदाम पाटील, पो.हवा.अनिल पाटील, सुनील साळुंखे, मधुकर गडगे, सचिन पवार, प्रमोद पाटील, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, राजेश बैकर, सचिन पाटील, पो.ना.दिपक डोंगरे, सुनील कुदळे, रुपेश पाटील, सचिन म्हात्रे, राहूल पवार, प्रफुल्ल मोरे, इंद्रजित कानू, पो.शि.संजय पाटील, प्रवीण भोपी आदींच्या पथकाने केली आहे.