सार्वजनिक स्थळांचे होणार मोफत फायर ऑडिट
पनवेल मधील टिळक रोड मित्रमंडळाचा पुढाकार
पनवेल/प्रतिनिधी : भिवंडीमधील हॉस्पिटल मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागून निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट ची गरज अधोरेखित झाली आहे. या पूर्वीही महाराष्ट्रासह देशात आगीच्या मोठ्या घटना होऊन प्रचंड मोठी आर्थिक आणि जीवित हानी झाली आहे. या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाच्या विषयावर पनवेल मधील समाजक्षेत्रातील एक अग्रणी संस्था ‘टिळक रोड मित्रमंडळाने’ पुढाकार घेऊन पनवेल व परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी मोफत फायर ऑडिट करण्याचे ठरविले आहे. मंडळाचे संस्थापक शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे सर्व सदस्य हा विषय यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंडळातील या विषयातील तज्ञ श्रीकांत साठे हे आशा प्रकारचे ऑडिट व पुढे त्या संबंधित खात्यातील कर्मचारी यांची मार्गदर्शक कार्यशाळा घेणार आहेत. श्रीकांत साठे हे आंतराष्ट्रीय दर्जाच्या विद्युत आस्थापनांमध्ये अनेक वर्षे या विषयायील तज्ञ म्हणून काम करत आहेत. या अभिनव संकल्पनेची सुरवात पनवेल मधील सहस्रबुद्धे हॉस्पिटल पासून करण्यात आली. हॉस्पिटल ची सर्व उपकरणे , वायरिंग, विद्युत जोडण्या, उपकरणे, त्यांनी व्होल्टेज या सह सर्व आवश्यक बाबी तपासण्यात आल्या, व नंतर एकूणच इलेक्ट्रिक बाबींच्या अनुषंगाने व आगीच्या घटना घडल्यास आवश्यक त्या खबरदारी- उपाययोजनां बाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. डॉ समीर सहसरबुद्धे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल मंडळाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. सरकारने ही अता अशी ऑडीट्स सक्तीची केली असून टिळक रोड मित्रमंडळाने विनामूल्य करून देण्याबाबात घेतलेला पुढाकार सामान्य जनता तसेच सरकारच्या धोरणांसाठी निश्चित कौतुकास पात्र आहे. पनवेल शहर पोलिस स्टेशन शी या संदर्भात चर्चा झाली असून पुढील टप्यात तेथे हे ऑडिट आणि कार्यशाळा राबविण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर सोमण यांनी दिली.