पोलिसांवरील वाढत्या ताणतणावामुळे मानसिक स्वास्थ्य अधिकारी नेमण्याची भाजपा कामगार आघाडीतर्फे मागणी
पनवेल दि.19 (वार्ताहर)- गेल्या काही दिवसांपासून पोलिस वर्गामध्ये वाढत्या ताणतणावामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मानसिक स्वास्थ्य अधिकारी नेमण्याची नवी मुंबई आयुक्तांकडे मागणी भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव, नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस व सहकार भारतीचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पोलिस बांधवांचे खालावत जाणारे मानसिक स्वास्थ्य हि चिंतेची बाब निर्माण झाली आहे. नुकत्याच दोन पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली तर एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. तर एक पोलिस बांधव कौटुंबिक कलहातून घर सोडून गेला होता. पोलिसांवरील कामाचा तणाव तसेच कौटुंबिक कलहामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावत असल्याचे दिसून येत आहे. तरी अशा पोलिस बांधवांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक महिला व हे एक पुरूष मानसोपचार तज्ञ नेमावेत व पोलिस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन, औषधोपचार, मानसिक स्वास्थ्य मिळावे यासाठी ते फायदेशीर ठरेल. तरी याबाबत शासनाने व पोलिस खात्याने विचार करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.