पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई ; सराईत चौकडीला केले गजाआड, 7 लाख 41 हजाराचा ऐवज केला हस्तगत
पनवेल, दि.23 (संजय कदम) ः पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करणार्या सराईत चौकडीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तळोजा परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 7 लाख 41 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
गेल्या काही दिवसापासून महागड्या लोखंडी प्लेटस् व इतर ऐवज, रोख रक्कम असे विविध गुन्हे पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या संदर्भात पो उप आ, परी 2 पनवेल शिवराज पाटील, सपोआ नितीन भोसले-पाटील, पनवेल विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि गुन्हे संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा रवींद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत, पोशी विवेक पारासूर आदींच्या पथकाने तांत्रीक तपास व गोपनीय बातमीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी समरान अब्बास पटेल, वय 24 वर्ष, शहाबाज अब्दुल रेहमान पटेल वय 23 वर्ष, मन्नन अजिज पटेल, वय 21 वर्ष रा.मन्ननकॉलनी, तळोजा, ता.पनवेल,जि.रायगड यांना निष्पन्न करून त्यांना तळोजा येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास करता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली आहे. सदर अटक आरोपी यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल इसम नामे मो.अशरफ अब्दुल मजीद शेख, वय 25 वर्श रा.हिंदुस्थान हॉटेंलचे मागे नावडे फाटा,तळोजा यास चोरीचा असल्याचे सांगुन विक्री केला असल्याचे सांगितल्याने मो.अशरफ अब्दुल मजीद शेख, यास अटक आहे. या प्रकरणी सदर आरोपींकडून चोरीच्या मालासह रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली इको कार व रिक्षा असा मिळून जवळपास 7 लाख 41 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.