हळदी, लग्न समारंभांवर पोलिसांचा वॉच
पनवेल/ वार्ताहर: पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हळदी, लग्न सोहळा समारंभ, साखरपुडा मोठ्या प्रमांणात होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने नवीन निर्बंध घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे हळदी, लग्न समारंभात गर्दी करू नये, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर
यांनी केले आहे.
पनवेलमधील शहरी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न व हळदी समारंभ काही प्रमाणात का होईना पण कमी लोकांच्या उपस्थितीत होत असलेले दिसत आहेत. परंतु पनवेलच्या ग्रामीण भागात सर्रासपर्णे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून हळदी व लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कोरोनाचे नियम हे सर्वांनीच पाळायचे आहेत, असे शासनाने वेळोवळी सांगूनही ग्रामीण भागात मास्क, सोशल डिस्टन्सिंग सारख्या सर्व नियमांचे उल्लंघन होत आहे. म्हणूनच आता अशा समारंभांवर पोलिसांचा वॉच असणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी अनेक लग्न समारंभ लॉकडाऊनमध्ये कमी लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागला आणि निर्बंध शिथील करण्यात आले. सुरुवातीला भयभीत झालेले लोक लॉकडाऊन उठल्यावर बिनधास्तपणे वागू लागले. साखरपुडे, लग्न समारंभ, स्वागत समारंभ असे गर्दीच्या सोहळ्याचे आयोजन होऊ लागले. यामध्ये शहरी भागात थोडेफार नियम पाळले जात आहेत, मात्र ग्रामीण भागात साखरपुड्या समारंभालादेखील 800 ते 1000 माणसांची उपस्थिती असते. याच गर्दीमुळे कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. म्हणूनच अशा समारंभांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
*पनवेलमधील ग्रामीण भागात होणार्या हळदी, लग्न समारंभांना 800 ते 1000 नागरीक उपस्थित राहतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अशा प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन व गैरकृत्य करणार्यांवर पनवेल तालुका पोलिसांचा वॉच *आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.
– *रवींद्र दौंडकर, वरिष्ठ निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे