कर्तव्यावरील पोलीसावर जीवघेणा हल्ला केलेल्या फरारी आरोपीस पनवेल गुन्हे शाखेकडून अटक
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस कर्मचार्यावर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपीला पनवेल गुन्हे शाखेकडून खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॉप येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा आरोपी फरार असल्याने त्याची अटक महत्वाची मानली जात आहे.
31 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.45 वा. सुमारास नेरूळ पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पो. शि. संतोष राठोड हे बालाजी मंदिर टेकडी सेक्टर 20 नेरूळ येथून त्यांच्या चारचाकी वाहनाने जात असताना सदर ठिकाणी 20 ते 25 वयोगटातील 5 इसम हे आरडाओरड करीत असताना आढळून आले होते. नमूद इसमांकडे एक विना नंबर प्लेट असलेली ऍक्टिवा मोटर सायकल होती. सदर मोटरसायकल बाबत पो. शि. राठोड यांनी विचारणा केली असता नमूद इसमानी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पो. शि.राठोड यांनी मदतीसाठी नेरूळ बीट मार्शल यांना कॉल केला असता त्याचा राग मनात धरून पाचही इसमांनी पो. शि. राठोड यांना ते बजावीत असलेल्या शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील दारूच्या बाटली पो. शि. राठोड यांच्या डोक्यावर फोडून, अर्धवट तुटलेल्या बाटलीने पुन्हा राठोड यांच्या तोंडावर वार करून त्यांना खाली पाडून दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. तसेच राठोड यांच्या चार चाकी गाडीवर मोठे दगड टाकून गाडीच्या काचा फोडून नुकसान केले होते. सदर बाबत नेरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.43/21कलम 307,353,333,427,143, 148,149 भा. द. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर सदर गुन्हा पोलीस कर्मचार्या वरील झालेल्या हल्ल्याबाबत असल्याने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे विजय चव्हाण यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ वय 23 वर्ष रा. रूम नंबर 01 चिंतामण को-ऑ. हाऊसिंग सोसा. सेक्टर 20 नेरूळ हा सदरचा गुन्हा घडल्यापासून मागील दोन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याचा ठाव ठिकाण्या बाबत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल चे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी पाठ पुरावा करीत असताना सदर आरोपी बाबत गुन्हे शाखा कक्ष 2 चे पो. उपनि.वैभव रोंगे यांना मिळालेल्या बातमी वरून गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली पो उप निरी वैभव रोंगे, पो. ना. सचिन म्हात्रे, रुपेश पाटील, दीपक डोंगरे यांनी गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ यास खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॉप परिसरातून ताब्यात घेतले . सदर आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यास पुढील कारवाई कामी नेरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.