पनवेल परिसरातील जाहिरातीचे होल्डींग ठरतात जीवघेणे
पनवेल, दि.18 (संजय कदम) ः पनवेल परिसरात मुख्य ठिकाणी त्याचप्रमाणे एस.टी.स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, महामार्ग, खाजगी इमारती व जागा या ठिकाणी उभारण्यात आलेले उंचच उंच जाहिरातीचे फलक (होल्डींग) हे तौक्ते चक्रीवादळात पनवेलकरांच्या जीवावर उठले असून अनेक ठिकाणी या होल्डींगचे पत्रे, फलक तसेच पोल पडल्याने अनेक झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
पनवेल महानगरपालिका हद्दीत पनवेल महानगरपालिकेची परवानगी घेवून, महामार्गावर संबंधित शासकीय कार्यालयांची परवानगी घेवून तर खाजगी जागांवर मुळ मालकाच्या परवानग्या घेवून हे होल्डींग उभारण्यात आले आहे. काही ठिकाणी 20 फुटी, काही ठिकाणी 40 फुटी तर काही ठिकाणी 60 फुटी असे होल्डींग एकावर एक उभारले गेले आहेत. तर होल्डींग उभारण्यासाठी लोखंडी गडर, पोल, ग्लॅव्होनाईज पत्रे, तारा, स्क्रु व फॅल्क्सचा वापर करण्यात येतो. या होल्डींगचे वेळोवेळी देखभाल होणे गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा सदर होल्डींग उभारल्यानंतर त्याच्या गंजलेल्या तारा, पत्रे, बदलले जात नाहीत. या होल्डींगला पाठीमागून रेड ऑक्साईड मारणे गरजेचे असते. परंतु या गोष्टीकडे सदर होल्डींग उभारणे कर्मचारी व मालक दुर्लक्ष करीत असल्याने मोठ्या वादळवार्यात हे होल्डींग निखळून निघतात, वाकतात तर कधी आडवे सुद्धा होतात. यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात व दुर्घटना घडल्या आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळात सुद्धा अनेक होल्डींग अशा प्रकारे पडले होते. पनवेल शहरातील आयटीआय जवळील होल्डींग सुद्धा काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात वार्यामुळे हलत होते. ही बाब नगरसेवक राजू सोनी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येवून त्याचे फोटो काढून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, इतर अधिकारी वर्ग, वॉर्ड ऑफिसर, फायर ब्रिगेड, पोलीस ठाणे व पत्रकार यांना पाठविले व सदर होल्डींग पडत असल्याची जाणीव करून दिली. यावेळी वॉर्ड ऑफिसर कडू हे त्या ठिकाणी पोहोचले व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ त्या भागात असलेल्या झोपडपट्टी मधील नागरिकांना बाहेर काढले व काही वेळातच हे होल्डींग त्या झोपड्यांवर आडवे झाले. वेळीच नागरिकांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. आगामी पावसाळी दिवसात अशा प्रकारच्या घटना होण्याची दाट शक्यता असल्याने पनवेल महानगरपालिकेसह संबंधित खात्याने या सर्व होल्डींगचे ऑडीट करावे व नित्कृष्ट दर्जाच्या होल्डींगवर दंडात्मक कारवाई करावी व ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या मार्फत भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.