नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी ५००० वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार
– नगरसेवक मनोज भुजबळ
पनवेल/वार्ताहर: नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या १० जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर २४ जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांच्याशी चर्चा केली असता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आणि हे नाव देण्यासाठी आम्ही पराकोटीचे प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले.
आपल्या भूमिकेचे विश्लेषण करत असता मनोज भुजबळ म्हणाले की आज एक नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक वकील अथवा वकीलांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका मांडत नाही तर एक त्रयस्थ,एक सामान्य नागरिक म्हणून मला असे वाटते की नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देणे संयुक्तिक होईल. हिंदुहृदयसम्राट हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांची संपूर्ण हयात त्यांनी मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी संघर्ष उभारण्यात, झटण्यात घालविले आहे. परंतु तरी सुद्धा नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देणे संयुक्तिक होणार नाही कारण आज तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक उभारले जात आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आजपर्यंत आमचे माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे अशाप्रकारे स्मारक उभारण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. दि बा पाटील यांनी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी निस्पृह पणाने कार्य करत आंदोलने उभारली, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून दिले.त्यामुळ नवी मुंबई वमानतळासाठी दि बा पाटील यांचेच नाव देणे उचित होईल.
भुजबळ पुढे म्हणाले की, मी माझ्या लहानपणापासून पाटील यांचे कार्य पाहत आलो आहे. निस्वार्थी पणाने झोकून देऊन कार्य करणारे नेते असाच त्यांचा मी उल्लेख करेन. त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता, स्वतःसाठी कुठलाही उत्पन्न स्त्रोत निर्माण न करता निस्सीम पणाने जनतेची सेवा करत राहिले. त्यांनी मनात आणले असते तर हजारो कोटी रुपयांची माया ते सहज जमू शकले असते. परंतु त्यांची राहणी अत्यंत साधी होती किंबहुना त्यांचे राहते घर आणि त्यांची गाडी यासाठी कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून तजवीज केली होती. सर्वसामान्यांचे नेतृत्व असणाऱ्या अशा सन्माननीय नेत्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेलेच पाहिजे.
सत्तरच्या दशकामध्ये सिडको आस्थापनाने भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्यानंतर अत्यंत तुटपुंजा मोबदला देण्याचे योजिले होते. थोड्याफार आंदोलनातून अत्यल्प मोबदला वाढविला देखील होता. परंतु लोकनेते दी बा पाटील यांच्या अभ्यासू आणि आक्रमक आंदोलनामुळे आज गावठाण विस्तार योजना अस्तित्वात आली आहे. साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा योजनेचे तत्त्व प्रस्थापित झाले आहे. पुढे जाऊन याच योजनेचे कायद्यात रूपांतर झाल्याने त्याचा राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराचा हा वाद निर्माण करण्याची गरजच नव्हती. कुठेतरी पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून कुरापत काढण्याचे काम या निर्णयाच्या पाठी आहे असे वाटते. रायगड नवी मुंबई कोकण किनारपट्टी सह संपूर्ण महाराष्ट्रातून लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला जात आहे. दी बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या आंदोलनात आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून रायगड, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण पालघर, नवी मुंबई अशा विविध ठिकाणचे 5000 वकिलांची फौज आंदोलनात उतरवणार आहोत.
चौकट
प्रकल्पग्रस्तांनी दी बा पाटील यांचे फोटो देव्हाऱ्यात लावले पाहिजेत..
लोकनेते दी बा पाटील यांच्या समवेत चा आठवणीतला किस्सा सांगताना मनोज भुजबळ म्हणाले की, कामोठे येथे गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडको बुलडोजर चालवत होती. सिडकोच्या या तोडक कारवाई विरुद्ध एका आंदोलनात मला पाचारण करण्यात आले होते. मी तिथे पोहोचलो असता व्यासपीठावरती अत्यंत साधेपणाने एक टेबल खुर्ची घेऊन पाटील साहेब स्थानापन्न झाले होते. अर्थातच आंदोलनाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. ग्रामस्थांनी मलादेखील व्यासपीठावर त्यांच्या बाजूला बसण्याचे साठी आग्रह केला. इतक्या मोठ्या ऋषितुल्य आणि दिग्गज नेत्याच्या बाजूला बसायचे या विचाराने मी अवघडून गेलो होतो. परंतु दि बा पाटील साहेबांनी मला अत्यंत प्रेमाने बाजूला बसवून घेत माझी विचारपूस केली. माझे नाव चांगल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या वाचण्यात येत असल्याचा कॉम्प्लिमेंट दिला. माझ्या कामाला शुभेच्छा दिल्या. इतक्या मोठ्या नेत्याने अवघ्या चार-पाच वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाशी इतक्या तरलपणे बोलण्याने माझ्यावर आलेले दडपण निघून गेले. इतके दिग्गज राजकीय नेते असून देखील फुकाचा रुबाब मिरवण्यापेक्षा अत्यंत साधेपणाने राहणे आणि उच्च विचार असणे अशी त्यांची विचारशैली होती. आज दि बा पाटील साहेबांच्या अभ्यासू,आक्रमक आणि धोरणी आंदोलनामुळे प्रस्थापित झालेल्या साडेबारा टक्के परतावा योजनेमुळे मी आणि माझ्या कुटुंबियांना सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत. माझे वडील नेहमी सांगत असत की प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी घराघरातून लोकनेते दि बा पाटील यांचा फोटो देव्हाऱ्यात लावून त्याचे पूजन केले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावणाऱ्या इतक्या सजग आणि दिग्गज नेत्याचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी आम्ही गरज पडल्यास पराकोटीचा संघर्ष करू.