ग्रामस्थ मंडळ पाणदिवे आयोजित वृक्षारोपण मोहीम
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )
दिवसेंदिवस ढासळत चाललेला निसर्गाचा समतोल, त्याकारणाने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत म्हणून निसर्गाचा समतोल राखण्याचा छोटासा प्रयत्न करता यावा या उदात्त हेतूने रविवार दि. 13 जून 2021 रोजी पाणदिवेच्या पूर्वेला डोंगराच्या मैदानी भागात ग्रामस्थ मंडळ आणि मित्र परिवार पाणदिवे यांच्या तर्फे साग, वड, पिंपळ, काशीद, करंज ,बांबू या झाडांसोबतच फणस, जांभूळ, आवळा, चिकू या फळझाडांची सुध्दा लागवड करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भरपूर संख्येने पाणदिवे येथील लहान थोरांनी हिरीरीने भाग घेऊन आणि वेळेत उपस्थित राहून अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला व झाडे लावून त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत योग्य संगोपन करण्याचा सर्वांनी संकल्प केला.
तसेच शेजारच्या गावांमधील गणेश गावंड (पिरकोन), विद्याधर गावंड (आवरे) यांनी झाडे, तसेच जयवन्त ठाकूर आणि शेखर म्हात्रे ,प्रदीप पाटील (फॉन टीम) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित तरुणांचे व ज्या थोर देणगीदाराणी सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरुप मदत केली त्यांचे ग्रामस्थ मंडळ पाणदिवे तर्फे अमित पाटील यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.