आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत रुपेश पाटील यांच्या चित्राची निवड.
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )
आय डबल्यू एस रशिया तर्फे आयोजित पहिले आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल साठी महाराष्ट्रातील रुपेश जनार्दन पाटील यांनी काढलेल्या ” फिशिंग बोट ” या चित्राची निवड झाली आहे.
आय डब्ल्यू एस रशिया तर्फे वॉटरकलर विथ लव्ह या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी जगातील 70 देशांतून 700 चित्रकारांनी आपले चित्रे या स्पर्धेसाठी पाठविली होती. एकूण 700 चित्रांपैकी फक्त 350 चित्रांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली.
रुपेश जनार्दन पाटील हे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल,उरण. जिल्हा रायगड या शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. आपल्या शैक्षणिक कार्यात ते तज्ञ आहेतच, त्यासोबतच ते उत्तम दर्जाचे चित्रकार आहेत. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त झाले आहे.
आय डबल्यु एस रशिया आयोजित पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल साठी रुपेश पाटील यांनी साकारलेले फिशिंग बोट चे चित्र सदर स्पर्धेसाठी पाठविले होते. रुपेश पाटील यांनी साकारलेल्या उत्कृष्ट चित्राला दाद म्हणजेच रशिया देशात होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वॉटर विथ लव्ह या फेस्टीव्हल साठी त्यांच्या फिशिंग बोट या चित्राची निवड करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा सेंट पीटर्सबर्ग येथे 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार आहे.
उरण तालुक्याचे भूमीपुत्र असलेले रुपेश पाटील यांच्या उत्तुंग भरारी बद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे. रायगड जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण देशाची मान उंचाविण्याचे काम रुपेश पाटील यांनी केले आहे.