रामचंद्र म्हात्रे विद्यालय, आवरेचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सेवानिवृत्त.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे) शिक्षण महर्षी स्व. बाळासाहेब म्हात्रे यांच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कोरोना संकटामुळे भेंडे सरांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरांच्या सौभाग्यवती कल्पनाताई, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष तथा पालक प्रतिनिधी सुनिल वर्तक, सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत आणि सरांची सुकन्या कु. आकांक्षा अश्या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विद्याधर गावंड सर यांचे ईशस्तवन, निवास गावंड सरांचे स्वागत गीत आणि नंदलाल सरांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची गोड सुरुवात झाली.
जवळपास सर्वच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या सोबत त्यांच्या कठोर पण कर्तव्यदक्ष वृत्तीचा,त्यांनी सर्व स्तरावर केलेल्या मदतीचा उल्लेख करून सरांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गायकवाड सर, आणि स्व. बाळासाहेब म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देताना सरांच्या सौ. कल्पनाताई आणि अनेक शिक्षक भावनाविवश झाले.
प्रमुख अतिथी रायगडभूषण राजू मुंबईकर यांनी गायकवाड सरांचे अनुभवी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगून यापुढेही त्यांचे मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.तर पालक प्रतिनिधी सुनिल वर्तक यांनी स्व. बाळासाहेबांनी आपल्या संस्थेत पारखून घेतलेले आणि संघटन कौशल्य असलेले खणखणीत नाणे असल्याचे गायकवाड सरांविषयी गौरव उद्दगार काढले.
समारोपात गायकवाड सरांनी आपली संस्था, शाळा, आपले ज्ञानदानाचे कार्य, पालक व विद्यार्थी या सर्वांशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य पार पाडा असा संदेश सर्वांना दिला.
सूत्रसंचालनातील सुमधुर वाणी आणि काव्यपंक्तीने शिवहारी गावंड सरांनी सर्वांची मने जिंकली, तर चिर्लेकर सरांनी मोजक्या शब्दांच्या प्रास्ताविकात गायकवाड सरांचा संपूर्ण जीवनपट डोळ्यांसमोर मांडला, शेवटी विद्याधर गावंड सरांनी उपस्थितांचे आभार मानले