चाकू हल्ल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक
पनवेल, दि.29 (संजय कदम) ः चौघा मित्रांवर हल्ला करून त्यांच्याकडे मोबाईल फोन जबरीने खेचण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विरोध केल्याने जमलेल्या इतर तिघांनी त्याच्या हातावर चाकूने मारुन जखमी करून पसार झालेल्या त्रिकुटापैकी दोघा जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सचिन चव्हाण (18) हा त्याच्या मित्रांसह पनवेलवरुन देवद गावाकडे जात असताना पनवेल रेल्वे स्टेशन मालधक्का पटरीजवळ तीन आरोपींनी सचिन चव्हाण व त्याच्या मित्रावर हल्ला करून त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यास त्यांनी विरोध केल्याने त्या तिघांनी त्यांच्या हातातील चाकूने मारुन सचिन चव्हाणसह सिद्धोधन पाईकराव, अनिकेत साळवी या तिघांना जखमी केले होते व ते पळून गेले होते. याबाबत अधिक तपासामध्ये आरोपी राजू थळसे, विकी शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा एक सहकारी फरार झाला असून त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.