आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवाना आवश्यक कागदपत्रे देण्यास सुरवात.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय उरण, उरण सामाजिक संस्था,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाला आवश्यक कागदपत्रे बनवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे वंचित राहिलेला आदिवासी समाजास ही सर्व कागदपत्रे काढून देण्यासाठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि उरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन वर्षांपासून पुढाकार घेतला असून आदिवासींना आज पर्यंत अनेक कागदपत्रे बनवून दिलेली आहेत. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदानाचे कार्ड,बँकेचे पास बुक जातीचे दाखले इत्यादी कागदपत्रे बनवून दिलेली आहेत. परंतु कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव वाढला आणि दुसऱ्या लाटेमुळे काही काळ हे काम थांबले होते. परंतु ही लाट ओसरल्यावर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ही मोहीम पुन्हा दिनांक 09/08/2021 रोजी सुरू करण्यात आली. ह्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमे अंतर्गत प्रामुख्याने जातीचे दाखले आणि वन हक्क दावे यावर भर देण्यात येणार आहे. तसेच राहिलेले रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदानाचे कार्ड, बँकेचे पास बुक इत्यादी चालूच राहणार आहे. सदर मोहीमे साठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार नरेश पेडवी, गोरेगावकर मॅडम पुरवठा अधिकारी, म्हात्रे मॅडम-निवडणूक कक्ष अधिकारी, मंडल अधिकारी , तलाठी, तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच जातीचे दाखले काढण्यासाठी उरण येथील सेतू कार्यालयातील शरयू मॅडम आणि त्यांच्या टीम ने खूप मेहनत घेतली. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या आदेशाने सेतू कार्यालयात जवळ जवळ एक हजार जातीचे दाखले काढण्याचे काम सुरू असून त्यातील जवळ जवळ 300 दाखले तयार झालेले आहेत. जातीचे दाखले काढण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण या कार्यालयतून विशेष सहकार्य मिळाले.आदिवासी प्रकल्प अधिकारी अहिर राव मॅडम, ऑफिस सुप्रिटेडंट आनंद पाटील,आदिवासी तपासणी अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. उरण तालुका वन अधिकारी शशांक कदम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असून वन हक्क दावे करण्यासाठी ते पूर्ण सहकार्य करणार आहेत असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच खावटी योजनेचा लाभ सर्वांना मिळावा ह्या करिता उरण सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि चिरनेर येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मोरे सर आणि तेथील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः घरोघरी जावून त्यांची कागद पत्रे गोळा करून ही योजना सर्व आदिवासी बांधवांना कशी मिळेल याची काळजी घेतली. ही सर्व मोहीम यशस्वी होण्यासाठी कातकरी प्रतिनिधी मनीष कातकरी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, कंठवली आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी वेश्वि यांनी अतोनात प्रयत्न केले. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील , सरचिटणीस संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मढवी आणि सर्व सदस्यांचा सहभाग आणि मार्गदर्शन नेहमीच राहिले आहे.