पनवेलमधील बिल्डरला तरुणीने लुटले!
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः सोशल मिडीयाव्दारे विशेषत: फेसबुकवर हनी ट्रॅपचे प्रकार वाढु लागले असल्याने अनोळखी सुंदरीच्या मोहजाळात फसू नका असे आवाहन वारंवार पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून केले जाते. मात्र त्यानंतरही या आवाहनाकडे दुर्लक्ष होत असल्याने आजमितीस यात अनेक जण अडकण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत. याबाबत काही जण तोंडी तक्रारी करतात तर काही जण बदनामीपोटी तक्रारी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
अवैध कमाईचे साधन कोण कुठून आणि कसे शोधून काढेल याचा काहीच अंदाज नाही. आजमितीस इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आहारी गेलेले अनेक जण अशा प्रकारांना बळी पडतांना दिसतात. यात पुरुषच नाही तर महिलाही बळी ठरत असून या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसा कमावण्याचा गोरखधंदा केला जात आहे. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली असून हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या व्यावसायिकाला लाखो रूपये गमवावे लागले आहेत.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. यात रविंद्र भगवान बदर (26), सचिन भातुलकर, आण्णा साळुंके (40), अमोल ढवळे (32), मंथन शिवाजी पवार (24) आणि 19 वर्षीय तरुणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोंढवा पोलिसांनी अटक केलेली तरूणी ही केवळ नववी पास आहे. मात्र असे असले तरी सोशल मिडीयाचा वापर करण्यात सदरची तरुणी चांगलीच पटाईत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप करणार्या नव्या टोळीचा उदय होवून तीही या टोळीची सदस्य बनली. यात पुढे अनेकजण या टोळीचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरुन तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसांपूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली. या टोळीने पनवेल येथील 31 वर्षीय व्यावसायिकाला मारहाण करत खंडणी उकळली होती. या घटनेंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तपास करून या टोळीला जेरबंद केले.