भूमी लॅंडमार्क प्रॉमिसेस को.सो.ला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान
पनवेल दि.21 (वार्ताहर)- पनवेल जवळील खांदा वसाहत सिग्नल जवळील भूमी लॅंडमार्क प्रॉमिसेस को.सो.ला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले असले तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे. परंतु यात तिघे जण जखमी झाले आहेत. येथील 4, 5, 6 मजल्यावर आज सकाळी इमारतीच्या डक्टला शॉर्टसर्किटमुळे अचानकपणे आग लागली. या इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर एचडीएफसी बॅंक, एक्सिस बॅंक, फिटनेस जिम व गाड्यांचे शोरूम, बांधकाम व्यवसायिकाचे कार्यालय या ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ होती. आगीच्या धुरामुळे काहींना त्रासही होत होता. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून वेगवेगळ्या कार्यालयात अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. घटनास्थळी एकूण 6 अग्निशमन दलाचे बंब पोहोचले होते. या आगीत अग्निशमन दलातील एक जवान व दोघे इसम असे किरकोळ जखमी झाले आहेत. फोटोः लागलेली आग