उरण सामाजिक संस्थेचा शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पूर्व विभागात मूळ जमीन मालकाला, शेतकऱ्यांना काहीही समजून अथवा कळून न देता त्यांच्या जमिनी परस्पर दुसऱ्यांच्या नावे होत आहेत यात काही शासकीय अधिकाऱ्यांचाही हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जमिनी न विकता परस्पर जमीन मालकाला अंधारात ठेऊन जमीन दुसऱ्यांच्या नावावर झाल्याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. आता हि प्रकरणे हळू हळू बाहेर येत आहेत. हि प्रकरणे उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच उरण तालुक्यातील पूर्व विभागातील शेतकऱ्यांना, जमीन मालकांना सावधान करत तलाठी ऑफिसमधून या वर्षीचे सातबारा उतारे लगेच त्वरित काढून घ्या. व त्यावर आपलेच नाव आहे की नाही ते तपासून घ्या असे आवाहन उरण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
उरण तालुक्याच्या तत्कालीन तहसिलदार कल्पना गोडे यांनी त्यांच्या कार्यकाळात काही शेतकऱ्यांच्या सातबारातील नोंदी बदलून , संगनमताने मूळ मालकांची फसवणूक केल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत . अलिकडेच मोठी जुई, येथील एका फ्रॉड प्रकरणात तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्यावर पोलीस केस दाखल झाली असून सदरहू तहसिलदार यांचा अटकपूर्व जामीन मा. न्यायालयाने फेटाळला आहे .उरण सामाजिक संस्थेने उघडकीस आणलेल्या एका प्रकरणात सदरहू तहसिलदारांनी एका ट्रस्टच्या नावे असलेली १६ कोटी रुपयांची जमीन चूकीचा वारस दाखला वापरून आणि खोटे प्रतिज्ञापत्र स्विकारून एका व्यक्तिच्या नावे केली आहे.सदर तहसिलदार यांनी गैरमार्गाचा वापर करून मूळ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची विंधणे, बोरखार या उरण मधील पूर्व विभागातील चारपाच प्रकरणे समोर आली आहेत . या सर्व पार्श्वभूमिवर उरण पूर्व विभागातील विशेषतः मोठी जुई , विंधणे , बोरखार, दिघोडे , वेश्वी या विभागातील शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे कि सर्वांनी आपापल्या जमिनीचे चालू वर्षाचे सातबारा उतारे काढून त्यात चूकीचे फेरफार झाला नसल्याची खात्री करून घ्यावी.आपल्या निदर्शनास एखादा चुकीचा प्रकार घडल्यास शेतकऱ्यांनी, जमीन मालकांनी उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.