क्रूरपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करणाऱया आरोपीला एपीएमसी पोलिसांनी 36 तासात केली अटक, आर्थिक देवाण घेवाणीतून हत्या केल्याचे उघड
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः एपीएमसी मार्केटमध्ये गत रविवारी प्लास्टिक पिशवीमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाचे तुकडे हे रवि उर्फ रविंद्र रमेश मंडोतीया (30) याचे असल्याचे तसेच सुमीतकुमार हरिषकुमार चौहान (27) या नातेवाईकानेच आर्थिक देवाणघेवाणीतून त्याची अत्यंत क्रुरपणे हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एपीएमसी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना, या हत्या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख पटवून आरोपी सुमीतकुमार चौहान याला 36 तासात अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
या घटनेतील मृत रवि मंडोतीया हा घणसोलीत रहाण्यास होता. तर त्याची हत्या करणारा आरोपी सुमितकुमार हा खैरणे गावात रहाण्यास होता. हे दोघेही एकमेकांचे दुरचे नातेवाईक होते. तसेच दोघेही कोपरखैरणेत वेगवेगळ्या इमारतीत साफसफाईचे काम करत होते. रवि मंडोतीया याने काही महिन्यापुर्वी सुमीतकुमार याच्याकडू उसने पैसे घेतले होते. मात्र रवि हे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये मागील दिड दोन महिन्यांपासून वाद सुरु होता. सुमितकुमार रविकडे आपल्या पैशांची मागणी सतत करत होता. मात्र रवि त्याला पैसे मागितल्यास मारुन टाकेन अशी धमकी देत होता. त्यामुळे हा खरच आपल्याला मारुन टाकेल अशी भिती सुमित कुमार वाटत होती. त्यामुळे त्याने रविचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार 9 सफ्टेंबर रोजी सायंकाळी रविची पत्नी आपल्या मुलांना घेऊन गार्डनला गेली असताना, सुमितकुमार रविसोबत दारु पिण्यासाठी त्याच्या घरात बसला होता. याचवेळी त्याने संधी साधुन चॉपरच्या सहाय्याने रविचा गळा चिरुन त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने चॉपर आणि सत्तुरच्या सहाय्याने घरातून बाथरुममध्ये त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्लॅस्टिक पिशवीमध्ये भरले. त्यानंतर हात आणि पायाचे तुकडे एपीएमसी मार्केटमधील माथाडी चौकातून पुनित कॉर्नरच्या दिशेने जाणार्या रस्त्यालगत टाकून दिले. तसेच त्याचे धड शिळफाटा येथे टाकून दिले, तर त्याचे मुंडके खैरणे गावाच्या पाठीमागील भागात जमिनीत पुरुन पुरावा नष्ट केला होता. दरम्यान, दोन दिवसानंतर रविवारी सकाळच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये दोन्ही हात पाय व दोन्ही मांडयाचे तुकडे सापडल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सदरचे तुकडे ताब्यात घेऊन डॉग स्कॉडच्या मदतीने मृत व्यक्तीचे मुंडके व धड शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना त्यात यश आले नव्हते. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले, वसीम शेख, गजानन कडाळे, शेवाळे, झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, पोलीस हवालदार धुमाळ व त्यांच्या पथकाने मिसींग व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या शोध मोहीमेत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या रवी मंडोतीया याच्या मिसींग तक्रारीतील वर्णन हे एपीएमसी मार्केटमध्ये सापडलेल्या मृत व्यक्तींशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिक चौकशीत एपीएमसी मार्केटमध्ये सापडलेले मृतदेहाचे तुकडे हे कोपरखैरणेतून मिसींग झालेल्या रवि मंडोतिया याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी बातमीदरामार्फत, सीसीटीव्ही कॅमेऱयाची पहाणी करुन व तांत्रिक तपासाद्वारे तपास करुन आरोपी सुमीतकुमार चौहान याला कोपरखैरणे येथून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी करुन शिळफाटा येथे टाकून दिलेले रविचे धड, तसेच खैरणे गाव येथे पुरलेले मुंडके हस्तगत केल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले.
हातावर गोंदलेल्या टॅटू मुळे मृतदेहाची पटली ओळख
आरोपी सुमीतकुमार याने मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत रवि मंडोतिया याच्या एका हातावर लिहीलेले रवींद्र व हनुमानाचा चेहरा असलेला टॅटू तो मिटवू शकला नाही. रविंद्र व हनुमानाच्या चेहऱयाच्या गोंदलेल्या टॅटू मुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविता आली.
चौकट
या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुमीतकुमार याने आपल्या मुळगावी उत्तर प्रदेश येथे दिड वर्षे मटणाच्या दुकानात खाटीक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्याने आपला नातेवाईक रवि मंडोतिया याची देखील अत्यंत क्रुरपद्धतीने हत्या करुन त्याचे वेगवेगळे तुकडे केल्याचे तपासात आढळुन आले आहे.
फोटो ः मृतदेहाचे केलेले तुकडे व पोलीस अधिकारी