सुफल आहाराच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत अन्नदान.
उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )समाजातील गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, अन्ना अभावी बालकांचे मृत्यू होऊ नये, लहान बालकांचे कुपोषण होऊ नये. त्यांना चांगले सुदृढ जीवन जगता यावे या दृष्टीकोणातून सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यात सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा झोपडपट्टीतील मुलांना दररोज एकावेळचे मोफत अन्नदान करण्यात येत आहे.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,धंदे व्यवसाय बंद झाले. घरातील कुटुंब प्रमुख व कुटुंबातील सदस्यांना रोजगाराचे कोणतेच पर्याय उपलब्ध नव्हते. शिवाय कोरोना काळात घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. अशा लॉकडाऊनच्या स्थितीत अनेक कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणात उपासमारी होत होती. कुटुंबातील लहान मुले अन्नासाठी तडफडत होती. कामधंदे नसल्याने लोकांच्या घरात राशन, अन्न पाणी नव्हते लोकांना उपाशी राहून दिवस काढावे लागत होते. या सर्व समस्या उरण मधील महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांच्या लक्षात येताच कोरोना काळात त्यांनी गोरगरीब कुटुंबातील लहान मुलांना, बालकांना दररोज मोफत अन्नदान करण्याचा निर्णय घेतला.कोरोना काळापासून सुरु असलेले अन्नदान आजही अविरतपणे, निस्वार्थी भावनेने, निरपेक्षपणे आजही चालू आहे.
सुफल आहाराच्या माध्यमातून गोरगरीब समाजातील लहान मुलांना एकवेळचे पोटभर अन्न मिळत असल्याने मुलांचे होणारी हेळसांड आता थांबली आहे. एकवेळचे सकस, पौष्टिक जेवण मिळत असल्याने बालकांचे कुपोषण थांबले आहे.अनेक व्यक्ती स्वतः जेवण बनविण्यापासून ते जेवण वाढण्या पर्यंत मोफत सेवा करत आहेत.सुफल आहाराची टीम द्वारे येथे अन्नदान करण्यात येते. मुलांना दररोज सकस आहार वेळेत मिळावा यासाठी प्रियांका सिंग, ईश्वरी कोंडीलकर,हंसराज चव्हाण,पप्पु सूर्यराव,सचिन उकार्डे, शिवानी कोळी, स्मिता नाखवा, सुरज सिंग, विकास शर्मा, प्रसाद पाटील,बादल म्हात्रे, पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्यासह सुफल आहाराची संपूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.असे सारिका पाटील यांनी सांगितले. ज्या इच्छुक व्यक्तींना अथवा सामाजिक संस्थांना या पवित्र कार्यात हातभार लावायचे आहे.त्यांनी सुफल आहारचे प्रमुख सारिका पाटील फोन नंबर 9664979696 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन सफल आहारच्या माध्यमातून करण्यात आले आहे.