विविध मागण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे लाक्षणिक उपोषण.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )
खारफुटी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी उरण सामाजिक संस्थेने करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या बंदर कंपनीविरोधात जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण वन विभाग यांच्याकडे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे देऊनही सदर कंपनी विरोधात गुन्हा दाखल न करता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे महसूल खाते सदर कंपनीची उघड-उघड पाठराखण करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत असा दावा उरण सामाजिक संस्थेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेने बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालया समोर उरण येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केले आहे.
महिना भर दिवसाढवळ्या खा्रफुटी झाडांची कत्तल करून ती झाडे समुद्रात फेकणाऱ्या करंजा टर्मिनलच्या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. सदर समुद्रात फेकलेल्या झाडांमुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळू देणे. करंजा टर्मिनल कंपनीमुळे मागील सात-आठ वर्षांपासून स्थानिक मच्छीमारांचे वार्षिक लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सदर नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती कार्यरत करावी. तोडलेली खारफुटी समुद्रातून वाहून नेणाऱ्या टग /बार्ज त्वरित जप्त करण्यात यावे व त्या जहाजाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेने लाक्षणिक उपोषण सुरू केल्याचे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सांगितले.जर या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून न्याय न मिळाल्यास उरण सामाजिक संस्थेतर्फे सदर कंपनी व कंपनीला पाठीशी घालणाऱ्या सरकारी अधिकारी विरोधात विशेषतः तहसीलदार उरण यांच्या विरोधात माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि माननीय राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याचेहि सुधाकर पाटील यांनी यावेळी सांगितले.
सदर उपोषणस्थळी उरण सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दिनेश घरत ,कार्याध्यक्ष भुषण पाटील, महिला अध्यक्ष सीमा घरत,उपाध्यक्ष राजेंद्र मढवी,सरचिटणीस संतोष पवार, कोकण मच्छीमार संघाचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गौरीकर,युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, अजित म्हात्रे, महिला सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी आदी उपोषणकर्ते यावेळी उपस्थित होते. उरण मधील विविध संस्था, संघटना तसेच अनेक मान्यवरांनी या उपोषणाला जाहिर पाठींबा दिला आहे.