360 पनवेल टाइम्सच्या व्यासपीठावर पनवेलमध्ये प्रथमच दिवाळी अंकांच्या पंढरीत संपादकांच्या मनमोकळ्या गप्पा..
पनवेल/प्रतिनिधी – आलेल्या संकटांवर मात करत,खर्चाचा भारही सोसत दिवाळी अंकांची परंपरा जपली असल्याचा आनंद दिवाळी अंकाच्या संपादकांनी मनमोकळ्या गप्पा मारताना व्यक्त केला.
दिवाळीच्या निमित्ताने 360 पनवेल टाइम्सचे संपादक व निर्माता गणेश कोळी व सुमंत नलावडे यांनी आयोजित केलेल्या *दिवाळी अंकाच्या भूमिकेतील संपादक* या चर्चासत्रात दिवाळी अंकांचे संपादक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या चर्चासत्रात दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले,रायगड मनोगतचे संपादक तसेच दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, इंद्रधनु दिवाळी अंकाचे संपादक विजय पवार, साहित्यविश्व दिवाळी अंकाच्या संपादीका प्रमिला जोशी,पनवेल टाइमचे संपादक गणेश कोळी उपस्थित होते.
दिवाळी अंक प्रकाशित करणे हे एक संपादकांसाठी आव्हानच असते. दिवाळी आणि दिवाळी अंक हे एक अतूट नात आहे त्याचप्रमाणे दिवाळी अंक आणि संपादक यांचे सुद्धा तेवढेच अतूट नाते असते. दिवाळी अंकांची निर्मिती करताना टिमवर्क हे महत्त्वाचे असते.साहित्यिकांचे साहित्य, लेख तसेच कवींच्या कविता, अप्रकाशित साहित्य,चालू घडामोडीतील विषय, जाहिरातदार – जाहिरातदारांचे सहकार्य, संगणक ऑपरेटर, प्रिंटिंग,वितरक,वाचक आणि येणाऱ्या अडचणी तसेच दिवाळी अंक तयार होऊन हातात आल्यानंतर होणारा आनंद या भूमिकेतून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांच्या वाटचालीविषयी संपादकांनी मनातील भावना व्यक्त करुन अगदी मनमोकळ्या चर्चा केल्या.
उपस्थित संपादकांचे स्वागत तसेच या चर्चासत्राचे मनमोकळेपणाने सूत्रसंचालन साहित्यिका सुनिता रामचंद्र यांनी केले.
यावेळी बोलताना दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले यांनी, दिवाळी अंकाची निर्मिती करताना जर आपली नियोजनपूर्वक यंत्रणा तयार असेल तर त्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला एखादा विषय देऊन त्याने साहित्य लिहावे ही भूमिका रामप्रहरची असल्याचे सांगितले.
साहित्यविश्व दिवाळी अंकाच्या संपादिका प्रमिला जोशी यांनी,दिवाळी अंक काढताना प्रत्येक संपादकांच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. दिवाळी अंक त्याची संपूर्ण तयारी ही संपादकासाठी कसरतच असते पण संपादक मात्र वाचकांना अगदी वेळेत अंक देण्याचा प्रयत्न करतात.
रायगड मनोगतचे संपादक संजय कदम यांनी, दिवाळी अंकासाठी जाहिरातीच्या खर्चाचे गणित जमले नाही तर मानसिक त्रास होतो.मी दरवर्षी स्वामींचे विचार आणि आचार घरोघरी पोहोचावे म्हणून श्री समर्थ दिवाळी विशेषांक प्रकाशित करत असल्याचे सांगितले.
इंद्रधनु दिवाळी अंकाचे संपादक विजय पवार यांनी,दिवाळी अंकासाठी संपादक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन्मानाने जाहिरात मिळवल्या पाहिजेत. दिवाळी अंक निर्मितीचा आनंद संपादक घेत असतात.पनवेल ही दिवाळी अंकांची पंढरी असल्याचे सांगितले.
पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी, दिवाळी अंक हे नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठच असते. दिवाळी अंक निर्मितीसाठी अडचणी येतात पण त्या अडचणी संपादकांना शिकवण देऊन जातात तसेच संयम आणि आनंद देतात असे सांगितले.