टेम्पो चालकावर वार करुन लुटमारी करणाऱ्या लुटारूंचा पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल दि.15 (वार्ताहर)- वापी येथून रोहा येथे जाणाऱया एका टेम्पो चालकाला मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी हातावर चाकूने वार करून त्याचा मोबाईल फोन लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. या लुटारु विरोधात खारघर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव अनिलकुमार श्रीरामफल (30) असे असून तो उत्तर प्रदेश राज्यातील आहे. सध्या तो वापी येथील एका व्यक्तीच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करत आहे. सध्या अनिलकुमार हा वापीतील कंपनीतून माल भरुन रोहा येथील डायकेम कंपनीत पोहोचविण्याचे काम करत आहे. गत 1 नोव्हेबंर रोजी सायंकाळी 7 वाजता वापी येथून टेम्पोत माल भरुन रोह्याच्या दिशेन जात होता. त्यानंतर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अनिलकुमार सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे आला आल्यानंतर त्याने टोल नाक्याच्या अलिकडे आपला टेम्पो रस्त्याच्या बाजुला उभा केला. त्यानंतर तो मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने टेम्पोच्या टायरची तपासणी करत असताना, त्याठिकाणी मोटारसायलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी अनिलकुमार याला शिवीगाळ करुन दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनिलकुमारच्या हातातील मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने एका लुटारुची मान पकडल्याने दुसऱया लुटारुने त्याच्याजवळ असलेल्या चाकुने अनिलकुमारच्या मनगटावर दोन तीन वार केले. यात तो जखमी झाल्यानंतर दोघा लुटारुंनी त्याच्याजवळ असलेला मोबाईल फोन लुटून मोटारसायकलवरून पलायन केले. त्यानंतर अनिलकुमार याने आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी कुणीही नसल्याने त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. त्यामुळे अनिलकुमार याने त्याच अवस्थेत टेम्पो चालत कोलाड येथे नेला. त्यानंतर त्याने तेथील रुग्णालयात उपचार घेऊन कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारुविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी खारघर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी लुटारुंचा शोध सुरु कला आहे.