हनुमान कोळीवाडा पुनर्वसित जागेची प्रशासनाकडून पाहणी.1 डिसेंबर रोजी होणारे आंदोलन आता 26 फेब्रुवारीला.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली दि 17/11/2021 रोजी ठीक 4 वाजता हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जेएनपीटीच्या जसखार येथील भराव केलेल्या जमिनीत शासनाने सन 1985 शासन निर्णयाने शेवा (हनुमान) कोळीवाडा गावातील 86 शेतकरी 170 बिगर शेतकरी असे एकूण 256 कुटुंबांना भूखंड जमीन वाटपाचे आणि शासनाच्या मापदंडाने नागरी सुविधा देण्याचे कामाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यावर सोपविली होती.त्या अनुषंगाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,जे एन पी टी प्रशासनाचे अधिकारी राजेश फडके, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आणि इतर अधिकारी यांनी कस्टम वसाहत जवळील जेएनपीटिच्या विकसित जमिनीत शासनाच्या माप दंडा नुसार 710 गुंठ्यात 256 भूखंड आणि शासनाच्या मापडंदा नुसार नागरी सुविधा देण्याचे मान्य व कबूल केले आहे.यावेळी सदर जमिनीची पाहणी शासकीय अधिकारी व हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केली.पुनर्वसनाचे काम करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने वेळ मागितल्याने हनुमान कोळीवाडा मंदिरात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ, पुनर्वसन कमिटी यांची तातडीने बैठक झाली. या बैठकीत 1/12/2021 रोजी होणारे आंदोलन दि 26/2/2022 रोजी ठेवण्याचे एकमत झाले. तसे निर्णयही जाहीर करण्यात आला. त्यामुळे हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.37 वर्षे लढा, संघर्ष केला असता आता कुठेतरी प्रशासनातर्फे हालचाल होऊ लागली आहे. मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची जर शासनाने फसवणूक केली तर 26/2/2022 रोजी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा, पुनर्वसन कमिटीने प्रशासनाला दिला आहे.