खारघर मधील संजीवनी स्कूल तर्फे ‘ई कचरा कलेक्ट’ मोहीम
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी ई-कचरा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. पर्यावरण रक्षणसाठी आता ई-कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याने खारघर मधील संजीवनी इंटर नॅशनल स्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांद्वारे स्कूल परिसरातील ई कचरा गोळा करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्यामुळे संजीवनी इंटर नॅशनल स्कूल प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 1.7 दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत उपकरणे टावून भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा ई- कचरा उत्पादक आहे. भारत देशात मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण होत होत असून, योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणासह आरोग्यालाही मोठा धोक्का निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये इलेक्ट्रॉनिक कचर्याचे होणारे घातक परिणाम या संदर्भात जनजागृती करण्यासाठी संजीवनी इंटर नॅशनल स्कूल प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक कचर्याचा धोका नियंत्रित करण्यासाठी आणि हवामान कृती प्रकल्पाचा एक भाग म्हणून, ‘संजीवनी इंटरनॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वंदना सक्सेना आणि निशिगंधा देवरे (क्लायमेट ऍक्शन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) यांनी विद्यार्थ्यांकडून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातून आणि परिसरातून ई-कचरा गोळा केला करुन स्कूल मध्ये जमा केला. गोळा केलेल्या वस्तूंमध्ये प्रिंटर, लॅपटॉप, जुने फोन, इअर फोन, चार्जर, कॉम्पॅक्ट डिस्क आदींचा समावेश आहे. या मोहीममध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असून, या मोहीमेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.