कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे ; अफवांवर विश्वास ठेवू नये…वपोनि विजय कादबाने
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेगवेगळे नियम जाहीर करण्यात येत आहेत. हे सर्वांना बंधनकारक असून त्याचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडीयाद्वारे पसरविण्यात येणार्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ठोस इशारा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वपोनि विजय कादबाने यांनी आज घेतलेल्या शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीच्या बैठकीत दिला आहे.
या बैठकीला वपोनि विजय कादबाने, पो.उपनिरीक्षक महाडिक, गोपनिय विभागाचे शैलेश जाधव यांच्यासह शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीचे नगरसेवक मुकीद काझी, जुबेर पटेल, नाविद पटेल, अशफाक काझी, मुदसिर पटेल, जावेद पटेल, साजिद पटेल, रशिद शेख, रफिक शेख, मन्सुर पटेल, इम्रान पटेल आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना वपोनि विजय कादबाने यांनी सांगितले की, सर्वांनी एकोप्याने राहणे गरजेचे असून पनवेल शहर हे सर्वांना सामावून घेणारे शहर आहे. त्याला एक इतिहास आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने सण, कार्यक्रम साजरे करतात. सध्या कोरोनाची लाट परत येण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी याच्याविरुद्ध लढा देण्यासाठी सुद्धा सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जशी मदत लागेल त्याप्रकारची मदत इतरांना करायची आहे. कोणीही अफवा पसरवू नये, या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.