नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने उघड्या गटारात अडकलेल्या म्हशीची केली सोडवणूक
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्यासह त्यांचे सहकारी मंदार देसाई यांच्या प्रयत्नामुळे एका गटारात अडकलेल्या म्हशीची अथक प्रयत्नानंतर सोडवणूक करण्यात आली आहे.
पनवेल मधील मार्केट यार्ड परिसरात उघड्या गटारात 1 म्हैस अडकुन पडली होती याची माहिती काही नागरिकांनी नगरसेवक राजु सोनी यांना दिली. त्यांनी तत्काळ त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना तेथे जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी ते जाऊन त्यांनी पाहणी केली व ताबडतोब महानगरपालिकेच्या यंत्रणा अग्निशामक दल व जेसीबी बोलवुन यांच्या सहायाने अडकलेल्या म्हशीचे प्राण वाचवून तिला जीवदान दिले व सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे येथे जमलेल्या सर्व नागरीकांनी नगरसेवक राजु सोनी व मंदार देसाई यांचे मनपूर्वक आभार मानले.