जबरी चोरी झाल्याचे भासवून पनवेल तालुका पोलिसांची फसवणूक करणारा टेम्पो चालक गजाआड
पनवेल, दि.09(संजय कदम): पनवेल जवळीस कर्नाळा खिंडीत जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार करुन फसवणूक करणाऱ्या टेंम्पो चालकाचा बनाव पनवेल तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
टेम्पो चालक जैसराज यादव(24) हा कर्नाळा घाटाच्या उतारावरून जात असताना पाठीमागूण येणाऱ्या 2 मोटरसायकल स्वारांनी त्यांचा टेंम्पो अडवून त्याने टेम्पो केबीन मधील ड्रायव्हर सीट खाली ठेवलेली रोख रक्कम 5,75,30/-रुपये व मोबाईल फोन असा मिळून 5,76,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी करुन पळून गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. त्यातक्रारी नुसार पनवेल तालुक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे अंकुश खेडकर, सपोनि विवेक भोईर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संजय गळवे, पोहवा विकास साळवी, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोना पंकज चांदीले, पोना प्रकाश मेहेर, पोना जयदीप पवार आदींच्या पथकाने सखोल तपास केला असता व त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दरम्यानच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची मोटार सायकल त्यावेळीस गेली नसल्याचे आढळून आले. तसेच तक्रारदाराची वर्तवणूक सुद्ध संशयास्पद वाटल्याने पोलिसी खा्नया दाखवताच त्याने आपण खोटी तक्रार दिल्याचे कबूल केले. सदर रोख रक्कमही गावी घर बांधायचे या हेतूने आपण हा बनाव रचल्याचे मान्य केले.