कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार संकुलात मध्ये उत्साहात शिवजयंती साजरी
खोपोली :
कुस्ती या मराठी मातीतल्या रांगड्या खेळाचे धडे गिरविणाऱ्या कुस्तीपटुं समवेतत्यांचे पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार ट्रस्टच्या कुस्ती संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. संकुलाचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी हे आयोजन केले होते. प्राविण्यप्राप्त कुस्तीगीरांचे यावेळी कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी जाणाऱ्या या संकुलातील महिला खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आणि वस्ताद गादेकर यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले..
ध्येयाचे वेड असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करतांना रायगडच्या मातीतून मल्ल निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांनी ठेवले होते, त्याचेच मी एक उदाहरण आहे अशी आठवण लक्ष्मण रीठे यावेळी सांगितली. खोपोली नगरपालिकेच्या माजी नगरसेविका माधवी रीठे यांनी कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना आपण स्त्री आहोत ही भावना मनात आणू नये, असा सल्ला देत महिलांसाठी कुस्ती संकुलाचे संचालन करणाऱ्या राजू कुंभार यांचे कौतुक केले. क्रिकेट आणि फुटबॉल सारख्या खेळांचं आकर्षण त्यागून कुस्तीसारख्या मर्दानी खेळात प्राविण्य मिळवण्याचे प्रयत्न करणाऱ्या महिला कुस्तीगीरांचे कौतुक करताना सामाजिक कार्यकर्ते गणेश ओसवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटना विशद केल्या. आजच्या युगातल्या तुम्ही हिरकणी आहात, तुमच्या हातून घडलेल्या कामगिरीतून येणाऱ्या भविष्यकाळात छत्रपतींच्या चरणी पदकांचे पुष्प अर्पण व्हावे अशी सदिच्छा गुरूनाथ साठेलकर यांनी यावेळी कुस्तीगीरांचेसमोर व्यक्त केली.
शिवव्याख्याते आकाश घरडे यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रतिकूल काळात खंबीर जिजाऊ माँसाहेब पाठीशी होत्या म्हणून छत्रपती घडले आणि त्यांच्या हातून स्वराज्य साकारलेअसे सांगत कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना तसेच उपस्थितांसमोर महाराजांच्या आयुष्यातली अंगावर शहारे आणणारी उदाहरणे देऊन मंत्रमुग्ध केले. त्यांच्याच हस्ते कुस्ती संकुलाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
शिवजयंतीच्या या स्फूर्तीदायक कार्यक्रमात बालकलाकारांनीही आपले कलागुण सादर केले आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी जगदीश मरागजे यांनी पार पाडली. कार्यक्रमानंतर सर्व कुस्तीगीरांना लोहगडाची सफर घडवून आणण्यात आली.