नामांकित मोबाईलची हुबेहूब नक्कल करून विक्री करणार्या विरोधात पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः आयफोन अॅपल मोबाईलचे साहित्य व मोबाईल कव्हर इत्यादी उत्पादनाचे हुबेहूब नक्कल व रंग संगती असलेली तसेच कोणत्याही स्वामीत्व हक्काचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पन्नाचा विक्री व साठा करून संबंधित कंपनीचे स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
या संदर्भात कुंदन बेलोसे यांनी कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष शेटे, सपोनि शिवाजी हुलगे, पो.उप.नि.मनोज महाडिक, पो.ना.रवींद्र पारधी, पो.ना.युवराज म्हात्रे आदींच्या पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन समोरील एन.के.हेरिटेज त्याचप्रमाणे मालधक्का परिसर व पटवर्धन हॉस्पिटलच्या मागे आदी ठिकाणी छापे टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून 3 लाख 44 हजार 450 रुपये किंमतीचे अॅपल कंपनीचे मोबाईल कव्हर, अॅपल कंपनीचे एअर पॉड, युएसबी केबल, मेघासेफ चार्जर, एअरपॉट केस इत्यादी ऐवज ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात कॉपीराईट अॅक्ट 1957 कलम 51, 63 प्रमाणे कारवाई केली आहे.
फोटो ः हस्तगत केलेला मुद्देमाल