पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला वेगळी वाट आत्मसात करणाऱ्या उद्योजिकेचा सत्कार
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संपन्न झाला सन्मान सोहळा
मळलेल्या वाटांवरून मार्गक्रमण न करता वेगळी वाट आत्मसात करण्याचे धाडस दाखविणाऱ्या उद्योजिका ऋतुजा महामुनी यांचा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने सन्मान केला.काजू चा कारखाना चालविणार्या ऋतुजा महामुनी हिने अल्पावधीतच या व्यवसायात जम बसविला आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऋतुजा हीचा सन्मान सोहळा सोमवार दिनांक 7 मार्च रोजी पळस्पे येथील ऋतुजाज नट्स झोन या फॅक्टरी मध्ये संपन्न झाला.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था आहे. दरवर्षी पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित करत असते. यंदाच्या वर्षी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे वतीने काजू व्यवसायात यशस्वी मार्गक्रमण करत असणार्या ऋतुजा महामुनी हीचा सत्कार करण्यात आला.तिला सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. ऋतुजा हिने पत्रकारितेला अलविदा करून ही वेगळी वाट आत्मसात करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दहा लाख रुपयांच्या यंत्रसामग्री ने सज्ज अशी फॅक्टरी उभारताना तिला बराच संघर्ष करावा लागला. आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून रोजगार निर्मितीमध्ये देखील त्यांनी हातभार लावला आहे. काजूच्या विविध प्रजाती काजू बोंडापासून वेगळ्या करून त्याची विक्री करण्याचे काम ऋतुजा हिच्या संस्थेमार्फत केले जाते. विविध फ्लेवर्स मध्ये बनविलेले काजू अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
पनवेल तालुका पत्रकार मंचने केलेल्या सत्कारामुळे मी सद्गदित झाले असून अशा प्रामाणिक संस्थांनी पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे एक अनामिक ऊर्जा प्राप्त झाल्याचे ऋतुजा म्हणाली. या सन्मान सोहळ्याला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.