पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीद्वारे रा.जि.प. शाळा कसबेवाडी चे नुतनीकरण
पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लि. ने त्यांच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत कसबेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केली, माणगावच्या पूर्वीच्या गटशिक्षणाधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा दुरुस्तीची विनंती केली होती. जून २०२० च्या निसर्ग चक्रीवादळात शाळेचे मोठे नुकसान झाले होते, शासनाच्या अनुदानाअभावी दुरुस्तीचे काम प्रलंबित होते. तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली असून, काही शाळांची दुरुस्ती झाली असली तरी अजून बऱ्याच शाळांच्या इमारती अद्याप नादुरुस्त आहेत.
नुतनीकरण केलेल्या शाळेचा उद्घाटन सोहळा दिनांक १६ मार्च २०२२ रोजी पोस्को कंपनीचे अधिकारी, शाळेतील मुले व त्यांचे पालक, ग्रामस्थ आणि तालुका स्तरीय अधिकारी यांच्या साक्षीने पार पडला. या शाळेतील शिक्षिकेने अनेक गोष्टींचा समन्वय साधून गावपातळीवर विशेष प्रयत्न करून हे काम पूर्णत्वास नेले आणि हा उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पाडला.
याप्रसंगी पोस्को कंपनी व्यवस्थापन म्हणाले कि, पॉस्को महाराष्ट्र स्टील आपल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सातत्याने पुढाकार घेत आहे. “हे कार्य, समाजात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची आमची बांधिलकी दर्शवते. या नूतनीकरण केलेल्या शाळेमुळे ज्ञान मिळविण्यासाठी येथे उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव कायम राहील. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी तालुका स्तरीय सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”