संत गाडगेबाबांचे काम हे मानवतेचे काम असल्याने ते निरंतन पुढे चालतच रहावे ः महिला व बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः संत गाडगेबाबा यांनी समाजासाठी केलेले काम हे मानवतेचे काम असल्याने ते पुढे निरंतन पुढे सुरू राहणारच आहे. अशा कामामुळे ऊर्जा मिळत असते. त्यामुळेच सर्वांनी या चांगल्या गोष्टी समाजापुढे न्यायला पाहिजे जो पर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात आहे चंद्र, सुर्य, तारे अहेत तो पर्यंत हे काम पुढे चालूच राहणार आहे, यसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन आज महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षा अॅड.यशोमती ठाकूर यांनी खारघर येथे आयोजित नुतन धर्म शाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
कै.सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती.उज्वलाताई सतीश हावरे यांनी श्री गाडगे महाराज मिशन या संस्थेस खारघर येथे रुग्ण सेवेसाठी एक तीन मजली सदन सेक्टर 20, शारदा सदन खारघर येथे विनामुल्य उपलब्ध करून दिले. या सदनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.प्रशांत ठाकूर, हावरे इंजिनिअर्स अॅण्ड बिल्डर प्रा.लि.च्या श्रीमती.उज्वलाताई हावरे, श्री गाडगे महाराज मिशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते, उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख, सचिव विश्वनाथ नाचवणे, सचिव सचिन घोंगटे, खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील, गाडगे महाराजांचे त्या काळातील चालक 93 वर्षीय भाऊरावजी काळे, प्रवीण हावरे, नगरसेविका नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी या संस्थेसाठी रुग्णसेवा गाडी देण्यात आली. त्याचे उद्घाटन आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, गाडगे बाबांच्या तत्वाला मानणारे व विश्वास असणार्या अनेक व्यक्ती या समाजात त्यांच्या विचाराने प्रेरित आहेत. त्यामुळे देशाला चांगले दिवस येणार आहेत यात शंका नाही. आज अनेकांकडे पैसा आहे. पण पैसे खर्च करणे त्यांच्याकडे दानत नाही. परंतु हावरे कुटुंबिय हे या सर्व गोष्टीला अपवाद असून त्यांनी स्वतःने ही गोष्ट स्वीकारून स्वखर्चाने पूर्ण करून दिली. तसेच आ.प्रशांत ठाकूर हे सुद्धा अशाच प्रकारे दुसरी वास्तू आम्हाला उभी करून देतील यात तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. कारण आ.प्रशांत ठाकूर हे आज वेगळ्या पक्षात असले तरी काही वर्षापूर्वी ते आमच्याबरोबर होते. त्यामुळे त्यांच्या कामाची मला पूर्ण माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. उज्वलाताई हावरे ही अशी व्यक्तीमत्व आहे ती कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपल्याला जबाबदारी दिली आहे ती पार पाडणे यातच धन्यता मानते व तीचे काम मी पहिल्यापासून बघत आल्याने तीने केलेल्या मागणीप्रमाणे सिडको व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून संत श्री गाडगेबाबा मिशन धर्म शाळेसाठी प्लॉट उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तर यावेळी बोलताना आ.प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, दररोज वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. परंतु त्या कार्यक्रमापैकी एखादा कार्यक्रम कायम स्मरणात राहतो. त्यातील आजचा कार्यक्रम आहे. आजचा खर्या अर्थाने प्रेरणा दिवस असून या कामाचे अनुकरण प्रत्येकाने करून संत गाडगे महाराज यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना उज्वलाताई हावरे यांनी सांगितले की, आज मला स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद होत आहे. कॅन्सर रुग्ण आपल्या कुटुंबात असल्यावर त्या कुटुंबाची काय मानसिकता होते हे मी लहानपणीच पाहिले आहे तसेच अनुभव घेतला आहे. ही वास्तू म्हणजे एक मनाला समाधान देणारी वास्तू असून या ठिकाणी 62 बेडची व्यवस्था केली आहे. साधारण वर्षभरात 22 हजार लोक या वास्तूचा फायदा व उपयोग करून घेतील. अशा प्रकारच्या कार्यामुळे नवनवीन काम करण्याची प्रेरणा मिळते व यासाठी समाजाचे व कुटुंबियांचे सहकार्य नेहमीच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, 1952 मध्ये गाडगे महाराज मिशनची स्थापना केली असून लोकांची व गोरगरीबांची सेवा करा, भूकेलेल्यांना अन्न द्या, गरजूंना शिक्षण द्या हा मानवतेचा संदेश गाडगे बाबांनी आम्हाला दिला आहे त्याचे आचरण आम्ही करत असून संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या मार्फत काम सुरू आहे. या कार्यक्रमाला हातभार लावण्याची उज्वलाताई यांची आत्मिक ईच्छा होती ती आज पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून मिशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
फोटो ः महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कापण्यात आलेली फित कापून वास्तूचे उद्घाटन, आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णसेवेचे उद्घाटन व सत्कार.