बांधकाम व्यावसायिकाकडून भूखंड मिळवून देण्याच्या बहाण्याने उकळले २ कोटी १५ लाख रुपये
पनवेल दि.२४ : वाशीत राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला भूखंड मिळवून देण्याच्या बहाण्याने पनवेल येथील राजू पुंडलिक देशपांडे या व्यावसायिकाने त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १५ लाख रुपये उकळून त्यांना भूखंड न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा युनिट-१ ने राजू देशपांडे याच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
सदर प्रकरणात फसवणूक झालेले वालजीभाई सांढा (५१) वाशीमध्ये राहण्यास असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. दहा वर्षापूर्वी वालजीभाई यांची जमिनीच्या व्यवहारात एजंटचे काम करणाऱ्या गुलाबसिंग राज पुरोहित आणि प्रकाश पवार या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांनी पनवेल येथे राहणाऱ्या राजू देशपांडे याची वालजीभाई यांच्यासोबत भेट करुन दिली होती. त्यावेळी या दोघांनी राजू देशपांडे मे विश्वास बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तसेच अनुमोल बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय करत असल्याचे सांगितले होते. तसेच राजू देशपांडे उच्चशिक्षीत असून तो इमानदारीने त्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगून वालजीभाई यांचा विश्वास संपादन केला होता. त्यावेळी राजु देशपांडे याने वालजीभाई यांना ‘सिडको’च्या साडेबारा टक्के योजनेबाबत आणि साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तींकडून भूखंड विक्री- सामंजस्य कराराद्वारे विकत घेण्याबाबत माहिती दिली होती. तसेच उलवेसह इतर ठिकाणच्या जागा त्यांना दाखविल्या होत्या. त्यानंतर राजू देशपांडे याने तळोजा, दापोली आणि उलवे नोड येथील भूखंड मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे असलेल्या भूखंडाची कागदपत्रे दाखवून तर कधी ‘सिडको’ मध्ये पैसे भरायचे आहेत असे सांगून वालजीभाई यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. वालजीभाई यांनी राजू देशपांडे याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्याप्रमाणे जमीन खरेदी करण्यासाठी रोख आणि चेकद्वारे तब्बल २ कोटी १५ लाख ५० हजाराची रक्कम त्याला दिली.मात्र, त्याने वालजीभाई यांना अद्यापपर्यंत एकही भूखंड दिला नाही. त्यामुळे वालजीभाई यांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क केला. तसेच त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. मात्र, राजू देशपांडे याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. अखेर त्याने वालजीभाई यांना त्याचे क्राईम बॅन्चच्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे आणि त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. शिवाय आपल्या घरी गेल्यास पत्नीला पुढे करुन तिला खोटी तक्रार देण्यास लावण्याची देखील धमकी दिली. त्यानंतर राजू देशपांडे याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वालजीभाई यांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.