ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील यांना पितृशोक!!
उरण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांचे वडील तथा उरण नगर परिषद शिक्षण मंडळाचे निवृत्त प्राथमिक शिक्षक श्री. रा. र. पाटील गुरुजी यांचे रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे ! निधनसमयी त्यांचे वय 84 वर्ष होते. शेतीवर अत्यंत श्रद्धा असल्याने एवढ्या वयात देखील ते दररोज सकाळी शेतावर गेल्याशिवाय राहत नसत . शेतीवर जाण्या बाबत त्यांना घरातील मंडळी काही बोलल्यास मला चालता फिरता राहू द्या असे म्हणायचे! निवृत्त प्राथमिक शिक्षकांची जुनी सरकारी देणी मिळावी यासाठी ते अगदी चार दिवसांपूर्वी देखील उरण पंचायत समितीत जाऊन जुने रेकॉर्ड शोधायला बसत असत. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर ते न खचता सर्व कुटुंबाचा आधार बनल्याचे कुटुंबाने अनुभवले आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात खोपटे येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले . त्यांच्या मागे तीन विवाहीत मुलगे , एक विवाहीत मुलगी , नातवंडे जावई , पतवडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम श्री.क्षेत्र नाशिक येथे 12 जुलै रोजी तर बारावे विधी 14 जुलै रोजी खोपटे पाटीलपाडा गावात होणार आहे. या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्विकारला जाणार नाही असे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.