ड्युटी मस्ट, धोधो पावसातही पोलीस ताई मागे हटल्या नाहीत
वडघरच्या खड्ड्यामुळे उरण नाक्यावर वाहतूक कोंडी
पनवेल/प्रतिनिधी — गेल्या अनेक दिवसांपासुन पाऊसाचा जोर वाढला आहे. पावसाची मजा देखील अनेकांनी लुटली. मात्र पनवेल उरण नाका येथे पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे दोन महिला कर्मचारी भर पावसात आपली ड्युटी बजावत होते. धो-धो कोसळणारा पाऊस आणि या पावसात भिजत ट्रॅफिक महिला पोलीस वैशाली कोकाटे व साधना पवार हे वाहतूक मोकळं करण्याचं काम करीत होते.
पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी हि नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक कोंडी जाणवणार नाही त्या दिवशी वाहनचालकांना चुकल्या सारखे वाटेल इतकी वाहतूक कोंडीची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. रस्त्यावरील बाजारपेठ आणि पार्किंग हि येथील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय रिक्षा थांबा हेसुद्धा वाहतूक कोंडीस कारण ठरत आहे. मात्र पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी पोलीस ड्युटीवर तैनात राहून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. नुकताच पावसाचा जोर वाढला आहे. मात्र पावसामुळे या भागात वाहतूक कोंडी वाढू लागली हे पाहून पावसाची पर्वा न करता येथे नेमलेले महिला वाहतूक पोलीस वैशाली कोकाटे व साधना पवार हे भर पावसात आपल्या उरण नाका पाईंटवर उभे राहिले आणि त्यांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पावसात उभं राहून वाहतुकीचे नियोजन केलं. या महिला जवानांची कर्तव्य निष्ठा पाहून ये जा करणाऱ्यांना पाहून ते मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही अशाच एका वाहन चालकानं त्या महिला पोलिसांचा फोटो मोबाईलमध्ये कैद केलाय आणि तो फेसबुकवर पोस्ट केलाय. या कामगिरीमुळे महिला पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होतोय.
वडघरच्या खड्ड्यामुळे उरण नाक्यावर वाहतूक कोंडी
पावसाळा आणि रस्त्यावर खड्डे ही दरवर्षीप्रमाणे होणारी समस्या आहे. पनवेलपासून वडघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्यामुळे पनवेलबाजूकडून वडघर आणि उरण बाजूकडून पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहतूक कोंडी होतं आहे. याबाबत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे तसेच पोलीस पाटील कुणाल लोंढे यांनी सिडकोकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सिडको या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.