स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा लॉकडाऊन विरोधात आंदोलनाचा इशारा
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई मनोज संसारे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय हा सर्वसामान्यांचा जीव घेणारा उपाय आहे. गेल्या वर्षभरात या लॉकडाऊनमुळे हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे लाखो लोकांच्या नोकर्या जावून त्यांचे संसार रस्त्यावर आले आहेत. मोलमजूर, हातगाडीवाले, टपरीवाले, चहावाले, सलून वाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हीच अवस्था सर्वसामान्य नागरिकांनी झाली आहे. तरी याबाबत शासनाने सहानुभूतीने विचार करावा. आगामी काळात गुढीपाडवा, 14 एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना आदी गोष्टीमध्ये लोकांना सहभागी होता येत नाही. त्यामुळे आंबेडकर जनतेचा आता धीर संपत चालला असून त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनता ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलीस आमनुषपणे वागत आहेत. सर्वसामान्यांवर उगाचच लाठीमार करीत आहेत. प्रत्येक कर्ता माणूस हा अतिशय मानसिक तणावातून जात आहे. कुटुंबातील माणसे कशी जगवावीत असा प्रश्न प्रत्येक कुटुंबातील कर्त्या माणसावर आ-वासून उभा आहे. त्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन रद्द करून त्या बदल्यात मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायर करणे, जमावबंदी हे उपाय वापरावेत अन्यथा या लॉकडाऊन विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल. काही दुकान चालू आहेत. त्यामुळे कोरोना वाढत नाही का? याचा सुद्धा विचार करावा व लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महेश साळुंखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
