पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव यांनी रक्तदान करून वाचविले प्राण
पनवेल, दि.9 (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव यांनी समय सुचकता दाखवून रक्तदान केल्याने त्यांच्याच खात्यातील एका कुटुंबियांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक अधिकारी व कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबियांना याची बाधा झाली आहे. अशाच प्रकारे त्यांच्या सोबत काम करणार्या एका कर्मचार्याच्या कुटुंबियाला कोरोनाची लागण झाली व ते उपचार घेत असताना त्यांच्या पत्नीला रक्ताची आवश्यकता भासली. यावेळी सर्वत्र शोध घेतला परंतु संबंधित रक्ताच्या बाटल्या न मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव यांनी स्वतः डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ येथे जावून रक्तदान केले व त्या रक्तदानाचा सदर कुटुंबियांना फायदा झाला. याबद्दल वरिष्ठ अधिकार्यांनी सुनील गुरव यांचे कौतुक केले आहे.
