पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांना श्रद्धांजली
राज्यातील 13 सहकार्यांच्या कोविड बळींना देखील वाहण्यात आली श्रद्धांजली
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः माथेरानचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना कर्जत येथून नवी मुंबई येथे रुग्णवाहिकेत नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांच्या अचानक मृत्यूने ने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारीतेवर शोककळा पसरली आहे.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच राज्यभरात कोविड मुळे बळी गेलेल्या 13 पत्रकार बांधवांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.
संतोष पवार हे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवले. उत्तम पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर ते कार्यरत होते. तसेच माथेरान नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही ते निवडून गेले होते. पांडुरंग रायकर नंतर वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने संतोष पवार यांच्या रूपाने हलगर्जी पणाच्या मुळे दुसर्या पत्रकाराचा बळी गेल्याने अध्यक्ष माधव पाटील यांनी खंत व्यक्त केली.संतोष पवार यांच्या सोबत तीन दशकांची मैत्री असल्याचे सांगत यावेळी ते भावनाविवश झाले.
या श्रद्धांजली कार्यक्रमास अध्यक्ष माधव पाटील यांच्या समवेत, मंदार दोंदे,विवेक पाटील,संजय कदम,अनिल भोळे,प्रशांत शेडगे, राजू गाडे,भालचंद्र(बाळू) जुमलेदार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
फोटो ः संतोष पवार यांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली