स्वच्छता अभियान राबून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
खांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम
मोकळा भूखंडावर जेसीबी डंपर च्या माध्यमातून साफसफाई
पनवेल /प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. याअंतर्गत बुधवारी खांदा वसाहतीत पक्षाच्यावतीने स्वच्छता अभियान घेऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोकळ्या भूखंडावर जेसीबी आणि डंपर च्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ झालेला आहे.
नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षांपूर्वी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सर्वात अगोदर सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला. ‘स्वच्छ भारत अभियान’ राबून देशाचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. आजही दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करीत असताना नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा ध्यास आणि कास सोडलेली नाही. गेल्या सहा वर्षात हे अभियान प्रभावीपणे राबविल्याने त्याचा सकारात्मक परिणाम देशात दिसून आला. त्यामुळे संपूर्ण देशाबरोबरच राज्य स्वच्छ ठेवण्यात मदत झालेले आहे. हे अभियान एक प्रकारे लोकचळवळ झालेले आहे. परिणामी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. पनवेल तालुक्यातही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खांदा वसाहतीत बुधवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रभाग समिती सभापती संजय भोपी, पक्षाचे खांदा कॉलनी अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड, ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी भाजपचा झेंडा दाखवून या अभियानाला सुरुवात केली. टी आय पी एल कंपनीच्या माध्यमातून डंपर आणि जेसीबी पुरविण्यात आले होते. सकाळी सुरू झालेल्या या अभियानात मोकळा भूखंडावरील डेब्रिज, पडलेल्या झाडांच्या फांद्या, झाडांचे खोड, पालापाचोळा त्याचबरोबर कचरा उचलण्यात आला. यावेळी रामनाथ पाटील , शांताराम महाडिक
गोपीनाथ मुंडे, प्रकाश खानावकर, चेतन जाधव, नवनाथ मेंगडे,
सचिन गायकवाड, संजय कांबळे, प्रवीण भोसले
जामले उपस्थित होते.
कोट
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पनवेल मंडल च्या वतीने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. बुधवारी खांदा वसाहतीत आम्हा नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान वसाहतीत यशस्वीपणे राबविण्यात आले. नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना अशा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देता आल्या. याचा मनोमन आनंद वाटतो.
सिताताई सदानंद पाटील
ज्येष्ठ नगरसेविका पनवेल महापालिका