मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले
पनवेल दि.23 (वार्ताहर)- गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळ पडलेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांचे चांगलेच हाल झाले असून मोठ्या प्रमाणात शहरी भागासह ग्रामीण भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. 22 सप्टेंबरच्या दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. शहरातील सखल भागात त्याचप्रमाणे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते. काही रस्त्यांना तर नदी नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या पाण्यातून आपल्या वाहनाद्वारे मार्गक्रमण कऱणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले तर कित्येकांची वाहने बंद पडल्याने भर पावसात त्यांना धक्का देत वाहने इच्छितस्थळी न्यावी लागली. ग्रामीण भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही भातशेती पिक यंदा घेण्यात आले होते. परंतु या भात पिकांवर आगोदर पडलेल्या रोगाच्या प्रादूर्भावासह आलेल्या मुसळधार पावसाने बहरलेली भाताची रूपे जमिनीवर आडवी झाली होती. पनवेल महानगरपालिकेसह सिडको विभाग व काही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने नाले साफसफाई वेळीच न केल्याने अनेक ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार घडले तर कित्येक ठिकाणी भरावाची कामे सुरू असल्याने पाणी बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत. 23 तारखेला सकाळ नंतर पावसाने उघडीक घेतल्याने पाण्याचा निचरा झाला आहे. परंतु या पावसाने मात्र अनेकांचे हाल झाले आहेत.