शिवसेना पुरविणार प्राणवायू; अभिनव उपक्रमाला सुरवात
पनवेल दि.26 (वार्ताहर)- कळंबोली शहर शिवसेनेच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. सध्याच्या कोरोना या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे बऱ्याच संक्रमित झालेल्या रुग्णांना वेळप्रसंगी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून रुग्णांना बऱ्याच वेळा तात्काळ हॉस्पिटल व ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पनवेल परिसरात पाहावयास मिळत आहेत. याच अनुषंगाने कळंबोली शहर शिवसेनेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाचा ऑक्सिजन गरजवंत रुग्णाला ताबडतोब मिळण्यासाठी शिवसेनेचे रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे महेश गुरव यांच्या कल्पनेतून त्याचप्रमाणे शहर संघटक विवेक गडकरी यांच्या सहकार्याने कळंबोली मधील मात्र रुग्णांसाठी हा प्राणवायू पुरवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या गरजवंतांना ऑक्सिजनची कमतरता वाटेल अशा गरजू रुग्णांना ही सुविधा पुरवली जात आहे यासाठी ९३२०१०६०९० तसेच ९०८२८८८८१६ या क्रमांकांवर संपर्क करून ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी हे शिवसैनिक सज्ज झालेले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर कळंबोली शहरा पुरतेच ही मोहीम राबवली जात असून भविष्यात याचा विस्तार वाढविण्याचा आमचा विचार असल्याचे महेश गुरव यांनी सांगितले. या उपक्रमामुळे कळंबोली शहरातील गरजू रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास महेश गुरव यांनी व्यक्त केला आहे.