सिडकोचे सातशे पेक्षा जास्त सफाई कामगार असुरक्षित कोरोना काळात सेवा बजावताही कोणताही सुरक्षाकवच नाही
आझाद कामगार संघटनेचा सिडको भवनचे गेट अडवले सिडको प्राधिकरणाने घेतली नरमाईची भूमिका
पनवेल, दि.७ (वार्ताहर) : सिडकोकडे काम करणाऱ्या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणताही सुरक्षाकवच नाही. परिणाम संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको भवन च्या गेट समोर ठिय्या आंदोलन करीत प्राधिकरणाची लक्ष वेधले. याबाबत त्वरित प्रस्ताव तयार करून तो व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवला जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांना दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सिडको अखत्यारित उलवे, करंजाडे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये काम करणारे स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात. ते सिडकोचे कामगार आहेत. त्याचबरोबर पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील सर्व रेल्वे स्थानक सिडको मुख्यालय आणि इतर क्षेत्रीय कार्यालयात सफाई कामगार काम करतात. धूर फवारणी सह 700 पेक्षा जास्त कामगार सिडकोकडे आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यासाठी आझाद कामगार संघटनेने कायम आवाज उठवला. कोरोना वैश्विक संकटात डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याबरोबरच सफाई कामगार सुद्धा कोविड यौध्दे म्हणून गणले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या कामगारांना विमा सुरक्षा कवच दिला जात आहे. त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून साधने पुरवली जात आहेत. परंतु सिडकोकडे काम करणाऱ्या स्वच्छताविषयक कामगारांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोच्या सफाई कामगारांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सिडको भवन च्या गेट समोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. सामाजिक अंतर राखून कामगारांनी सिडकोच्या धोरणाचा निषेध नोंदवला. फलकाद्वारे आपल्या मागण्या सिडको समोर मांडल्या. सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस बावस्कर, सिडको रेल्वे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे, मुख्यालयाचे अधीक्षक अभियंता फुलारे यांनी कामगारांच्या वतीने महादेव वाघमारे यांना चर्चेस बोलवले, कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व मागण्यांबाबत सिडको सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे प्रस्ताव तयार करून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवणार असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
या आहेत सिडको सफाई कामगारांच्या मागण्या
1) सिडकोच्या सफाई कामगारांना कोविड-19 चा पन्नास लाख रुपये विमा जाहीर करणे 2) कोविड-19 चा सफाई कामगारांना भत्ता देणे 3) कोरोना संसर्गजन्य रोगाची योग्य ती सुरक्षा साहित्य देणे4) खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा सफाई कामगार निवृत्ती म्हात्रे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे . त्यांच्या कुटुंबाला सिडकोने तातडीने 50 लाख रुपये देणे 6) चालू वर्षाचा (2020) दोन जोडी गणवेश देणे
मनपा सफाई कामगारांसाठीही आझाद कामगार संघटनेचा अखंडित लढा
पनवेल परिसरातील सिडको वसाहती पनवेल महानगरपालिके कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत . दोन वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन, साफसफाई, औषध फवारणी या सेवासुद्धा मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. परिणामी पूर्वी सिडकोकडे काम करणारे कामगार आता महापालिकेत काम करीत आहे. या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आझाद कामगार संघटना लढत आहे .
कोट
सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्यासाठी सिडको भवन गेट वर सफाई कामगारांनी केले ठिय्या आंदोलन केले. बेलापूर पोलिसांनी मध्यस्थी करून सिडको अधिकारी आणि आझाद कामगार संघटनेची बैठक घडवून आणली. आझाद कामगार संघटनेच्या सर्व मागण्या सिडकोने मान्य केल्या.
लवकरच सिडको कोविड -19 चा 50 लाख चा विमा , कोविड भत्ता आणि कोरोना मुळे खांदेश्वर रेल्वे स्टेशनवरील मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आझाद कामगार संघटनेने हे आंदोलन केले. त्याला यश मिळाले आहे. याबाबत अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याला जबाबदार असेल
महादेव वाघमारे
अध्यक्ष आझाद कामगार संघटना