खेड येथे घरफोडी करून मुंबईकडे पळणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 12 तासात करण्यात आले गजाआड
पनवेल, दि.9 (संजय कदम) ः रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या गावातील एका ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम घेवून मुंबई बाजूकडे एका खाजगी वाहनातून जात असताना सदर वाहनाच्या चालकाला त्या व्यक्तीचा संशय आल्याने त्यांची गाडी पनवेल येथे आल्यावर त्याने यावेळी गस्त घालीत असलेल्या पोलीस नाईक रवींद्र पारधी यांना खुणेने पुढे थांबवून सदर व्यक्तीची माहिती दिल्यानंतर पनवेल पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्या व्यक्तीने घरफोडी केल्याचे कबूल करून घरफोडीतील 1 लाख 26 हजार रुपये पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी वहाजल छोटू खान (रा.खेड) याने खेडमध्ये घरफोडी करून रोख रक्कम 1 लाख 20 हजार रुपये घेवून तो मुंबईच्या दिशेने येत होता. यावेळी त्याने एका खाजगी गाडीकडे महामार्गावर लिफ्ट मागितली. सदर गाडी चालकाने त्याला लिफ्ट दिल्यावर प्रवासाच्या दरम्यान आरोपी हा वेळोवेळी त्याच्याकडे असलेली रोख रक्कम मोजत होता. तसेच इतर कागदपत्र फाडून टाकून देत होता. त्यामुळे गाडी चालकाला संशय आला व त्यांची गाडी पनवेल हॉटेल गार्डन जवळ येताच त्याने त्या ठिकाणी गस्त घालत असलेल्या पो.ना.रवींद्र पारधी यांना खुणावून गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानुसार पारधी यांनी त्यांची गाडी थांबवून चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गाडीत बसलेली व्यक्ती संशयित असल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित आरोपीला ताब्यात घेतले व याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना दिली. तातडीने याबाबतची माहिती माळी यांनी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांना सांगितली व पोलिसी खाक्या दाखवून त्याची चौकशी केली असता त्याने खेड येथे घरफोडी केल्याचे कबूल केले व सदर चोरीची रक्कम घेेवून मुंबई येथे जात असल्याचे सांगितले. याबाबत खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली असता त्यांनी सुद्धा सकाळी या संदर्भात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यानुसार खेड पोलीस ठाण्याचे पथक पनवेल शहर पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आरोपीला रोख रक्कमेसह ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सुद्धा खेड परिसरात त्याने घरफोडी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
कोट
नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचप्रमाणे पेट्रोलिंग करणारे पो.ना.रवींद्र पारधी यांच्या प्रसंगावधानाने आरोपीची चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आले व सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात मिळाला आहे. नागरिकांनी अशाच प्रकारे जागृत राहिल्यास अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.
पो.नि.शत्रुघ्न माळी
फोटो ः सराईत घरफोड्यांसह पो.नि.शत्रुघ्न माळी व पारधी
