अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करुन पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः अज्ञात महिलेने मदत मागण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून रोख रक्कम उकळून त्याला अमेरिकन डॉलर ऐवजी नोटांच्या आकाराचे कागदी बंडल देऊन त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकिस आली आहे. कळंबोली पोलिसांनी सदर महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव बाळासाहेब खाडे (35) असे असून तो पनवेलच्या आदई गावात रहाण्यास आहे. बाळासाहेब कामानिमित्त कळंबोलीत गेला असताना, तेथील शिवसेना शाखेजवळ एका अज्ञात महिलेने त्याच्याकडे मदतीची याचना केली. त्यामुळे बाळासाहेब याने तिच्याकडे विचारपुस केली असता, सदर महिलेने तिच्याकडे 10 हजारापेक्षा अधिक रक्कमेचे परदेशातील डॉलर असून ते घेऊन 5 हजार रुपये दिल्यास तिला मदत होईल असे सांगितले. तसेच तिने तिच्याकडे असलेले डॉलरच्या नोटांचे बंडल बाळासाहेब त्याला दाखविले. यावर बाळासाहेब याने त्याच्याकडे फक्त 3 हजार 200 रुपये असल्याचे सांगितल्यानंतर सदर महिलेने सदर रक्कम घेऊन त्याबदल्यात त्याला डॉलर देत असल्याचे भासवून नोटांच्या आकाराचे कागदी बंडल त्याला देऊन त्याठिकाणावरुन पलायन केले. या काही वेळानंतर बाळासाहेब याने महिलेने दिलेल्या नोटांच्या बंडलची तपासणी केली असता, त्यात फक्त वरची पहिली नोट 20 डॉलरी असल्याचे व त्याच्या खाली सर्व कागदी बंडल असल्याचे आढळुन आले. त्यानंतर सदर महिलेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानतर बाळासाहेब याने कळंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.
