गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल जवळील माची प्रबळ येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आज पनवेल तालुका पोलिसांना व शोध पथकाला कलावंती बुरुजाजवळ आढळल्याने पोदी परिसरात शोककळा पसरली होती.
पनवेल जवळील पोदी-1 येथे राहणारा अनुराग गुडीले (22) हा शनिवारी मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर त्याचा संपर्क होत नसल्याने सोमवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन घेतले असता ते माची प्रबळ परिसरात आढळून आले. त्यानुसार सदर हद्द ही पनवेल तालुका पोलिसांची असल्याने विशेष पथक व तरुण वर्ग त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेले असता तेथे त्याचा आज मृतदेह आढळून आला. त्यानुसार सदर घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.